कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी यंदा कोल्हापूर विभागातील एक लाख २३ हजार ७९३ विद्यार्थी बसले आहेत. ही परीक्षा विभागातील १३५ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय सचिव शरद गोसावी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचनासाठी व आकलन करण्यासाठी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पेपरच्या अगोदर अर्धा तास हजर होणे आवश्यक आहे. जर ११ वाजता पेपर असेल, तर त्याला १०.३० वा. परीक्षा परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. १०.४० वा. उत्तरपत्रिका दिली जाणार आहे. त्यानंतर १०.५० वा. प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. दहा मिनिटांत त्याने प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी. अकरा वाजता लिहिण्याची परवानगी दिली जाणार आहे. जरी १०.५० वा. प्रश्नपत्रिका दिली तरी ११ वाजताच त्याला लिहिण्यासाठी परवानगी मिळणार आहे, असे गोसावी यांनी सांगितले. गोसावी म्हणाले, कोल्हापूर विभागात १३५ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कॉपी तपासणीसाठी सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मंडळ सदस्यांच्या पथकाद्वारे विभागातील कोणत्याही केंद्रावर जाऊन तपासणी केली जाणार आहे. परीक्षा सुरळीत, शांततेत पूर्ण व्हाव्यात यासाठी कोल्हापूर विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आदींच्या संघटनांच्या बैठका विभागीय मंडळातर्फे घेण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना मिळणार दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका
By admin | Published: February 15, 2015 12:50 AM