कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय व अभ्यासिका ही विनाविलंब सुरू करावी. पीएच.डी. संशोधकांसाठी नवीन बांधलेले वसतिगृह सुरू करावे, या मागण्यांसाठी ऑल इंडिया यूथ आणि स्टुडंटस् फेडरेशनने सोमवारी रस्त्यावर अभ्यास हे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांना दिले.फेडरेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात हे आंदोलन केले. यावेळी त्यांनी ग्रंथालय अभ्यासिका बिनशर्त सुरू झाल्याच पाहिजे, ग्रंथालय आमच्या हक्काचे, लढेंगे जितेंगे अशा घोषणा दिल्या. त्यानंतर शिष्टमंडळाने डॉ. गुरव यांच्याशी चर्चा केली.
पुढील आठ दिवसांत ग्रंथालये, अभ्यासिका सुरू करण्यात आली नाही, तर कुलगुरूंच्या कक्षामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन अभ्यासाला बसण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी फेडरेशनचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, आशुतोष गावडे, सुरेश कोकरे, केदार तहसीलदार, आरती रेडेकर, संदेश माने, योगेश कसबे, सुनील कोळी, रजत शेख, आदी उपस्थित होते.
इतर विद्यापीठामध्ये अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. एक महिन्यापूर्वी आम्ही कुलगुरूंना निवेदन देऊन शासनाच्या आदेशानुसार ग्रंथालय, अभ्यासिका सुरू कराव्यात, अशी विनंती केली होती. पण, प्रशासनाने विद्यापीठ आवारातील बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय, अभ्यासिका सुरू केलेली नाही. ही लवकर सुरू व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन केले आहे.-गिरीश फोंडे