कागल : कागल नगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरपालिकेने उभारलेल्या ‘अभ्यासिका, कॉम्प्युटर लॅबमधील शिल्लक संगणक आणि साहित्य’ या विषयावर सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी नगरसेवक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. एकेरी भाषेत एकमेकांचा उल्लेख करण्यात आला. सभागृहात वापरण्यात आलेले शब्द अवमानकारक असल्याने, ते विषय पटलावरून काढून टाकण्याचा निर्णय घेऊन पुढे कामकाज सुरू ठेवण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संगीता गाडेकर होत्या. उपनगराध्यक्ष उषाताई सोनुले, मुख्याधिकारी टीना गवळी उपस्थित होत्या. कागल नगरपरिषदेच्या मालकीचे जलतरण तलाव, अॅम्युझमेंट पार्क, संगणक लॅब, शाहू क्रीडांगण, व्यायामशाळा आणि बाजार टॅक्स वसुली हे वार्षिक ठेका पद्धतीने चालविण्यास देण्याच्या विषयावर या चर्चेला तोंड फुटले. भैया इंगळे यांनी हा विषय उपस्थित केला, तर संजय कदम यांनी यापूर्वीचे ठेकेदार आणि आताची परिस्थिती यावर माहिती मागविली. सत्ताधारी गटाचे संजय चित्तारी आणि विरोधी भैया इंगळे यांच्यासह पक्षप्रतोद रमेश माळी, आशाकाकी माने यांनी हस्तक्षेप करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. विद्यमान सभागृहाची ही शेवटची सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता असल्याने, चांगल्या पद्धतीने कामकाज चालवूया, असे आवाहन नगराध्यक्ष गाडेकर यांनी केले. सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना कामासाठी उभारण्यात आलेले खड्डे-खुदाईचा माल दीपावलीपूर्वी स्वच्छ करावा, अशी मागणी मनोहर पाटील यांनी केली, तर हे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल प्रवीण गुरव, रमेश माळी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ऐनवेळच्या विषयामध्ये मारुती मदारे यांनी लक्ष्मी मंदिर कमानीच्या प्रलंबित कामाबद्दल जाब विचारला. नम्रता कुलकर्णी यांनी गटर्सच्या कामाबद्दल, तर रंजना सणगर यांनी धनगर समाज मंदिराबद्दल प्रश्न उपस्थित केला. यावेळी सन्मती चौगुले, बेबीताई घाटगे, सुमन कुऱ्हाडे यांनीही मत व्यक्त केले. सोमवारच्या सभेतील विषय... उरुसापूर्वी शहरातील सर्व पुतळे सुशोभीत करणे, उरुसासाठी स्वच्छता मोहीम राबविणे, कचरा संकलनासाठी नवीन वाहने खरेदी करणे, नगरपालिकेच्या मोकळ्या राखीव जागांना कंपौंड करणे, रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा कुंडी बसविणे, विविध वार्षिक ठेके देणे, कल्याणी पार्कमध्ये दिवाबत्तीची सोय करणे.
अभ्यासिका, लॅबप्रश्नी खडाजंगी
By admin | Published: October 18, 2016 1:11 AM