नसीर शिकलगारफलटण (जि. सातारा) : बरड (ता. फलटण) येथील पंधरा वर्षीय गुरुदेव बाबा चव्हाण हा नववीत शिकणारा विद्यार्थी त्याच्या ६ फूट ७ इंच उंचीमुळे चर्चेत आहे. अधिक उंच असल्याने त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेक जण त्याच्या मागे-पुढे असतात.
फलटणमधील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये नववीत गुरुदेव शिकत आहे. त्याची झपाट्याने वाढत चाललेली उंची सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे. गुरुदेवचा जन्म १२ जुलै २००७ रोजी झाला असून, त्याची उंची सहा फूट सात इंच म्हणजेच दोनशे सेंटीमीटर झाली आहे. त्याचे वजन साठ किलो असून, त्याला आताच बारा नंबरची चप्पल लागते. ती त्याला बनवूनच घ्यावी लागते. गुरुदेवचे आई-वडील आणि लहान भाऊही सहा फुटांच्या आसपास आहेत. गुरुदेव रोज एसटीने शाळेला येतो. अधिक उंच असल्याने त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेक जण त्याच्या मागे-पुढे असतात. गुरुदेवचे वडील बाबा चव्हाण म्हणाले, आमच्या कुटुंबातील सर्वांची उंची सहा फुटाच्या आसपास आहे. त्यामुळे गुरुदेव सहा फुटांच्या आसपास उंच होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दहा वर्षांनंतर त्याची उंची प्रमाणापेक्षा जास्त वाढू लागली.
शाळेत खास बेंच : गुरुदेवची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यातच तयार कपडे बसत नसल्याने संस्थेमार्फत त्याला कपडे व बारा नंबरची चप्पल दिली आहे. शाळेत त्याला बसण्यासाठी खास बेंच दिला आहे. त्याच्या करिअरच्या दृष्टीने आम्ही वैयक्तिक लक्ष देणार असून, त्याच्यासाठी शाळेमध्ये बास्केटबॉल खेळ सुरू करणार आहोत, अशी माहिती श्रीराम सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी दिली.
चव्हाण यांच्या कुटुंबात आनुवंशिकता आहे. पंधराव्या वर्षी मुलाची साधारण उंची १६६ सेंटिमीटर असते. दरवर्षी चार सेंटीमीटरने उंची वाढते. मात्र, गुरुदेवची उंची आताच दोनशे सेंटीमीटर आहे. त्याच्या तपासण्या केल्यास उंचीमागचे कारण समजू शकेल. त्याच्या उपचाराचा खर्च मी करण्यास तयार आहे. - डॉ. सुभाष गुळवे, वैद्यकीय अधिकारी, फलटण