लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील प्रलंबित कामांकडे दुर्लक्ष करून शहरवासीयांचे अन्य गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यमान आमदार स्टंट करीत आहेत, असा आरोप करून, येथील बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आधीपासूनच आहे. ते अधिकृत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठपुरावा करून परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. शिवतीर्थ नूतनीकरणाच्या उद्घाटनासोबतच त्याचे उद्घाटन होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे व माजी आमदार राजीव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इचलकरंजी बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, यासाठी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आमदार प्रकाश आवाडे यांनी आंदोलनाचा स्टंट केला. वाढलेली महागाई, इंधन दरवाढ याबाबत शब्द न काढता, शहरातील अन्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होण्यासाठी हा त्यांचा खटाटोप आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण करणे हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी विठ्ठल चोपडे, प्रकाश पाटील, बाळासाहेब देशमुख, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
रक्तदान करण्याचे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इचलकरंजीतील राष्ट्रवादी कार्यालयात आज, शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.