सकल मराठा समाजाने कोल्हापुरात आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत दि.१६ जून रोजी मूक आंदोलन केले. त्यानंतर पुणे येथील ‘सारथी’च्या मुख्य केंद्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यामध्ये खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या मागणीनुसार कोल्हापूरमध्ये सारथीचे उपकेंद्र सुरू करण्यास उपमुख्यमंत्री पवार यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सोमवारी (दि.२१) पालकमंत्री सतेज पाटील आणि सकल मराठा समाजातील समन्वयक वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आदींनी शिवाजी विद्यापीठ (राजेंद्रनगरकडील परिसर), राजाराम महाविद्यालय (प्री-आयएएस ट्रेनिंगजवळील परिसर), विचारेमाळ येथील समाजकल्याण विभाग आणि सदरबाजार येथील राजर्षी शाहू कॉलेजजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांची पाहणी केली होती. या उपकेंद्रासाठी राजाराम महाविद्यालय अथवा शिवाजी विद्यापीठातील जागेचा विचार करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी विद्यापीठ आणि राजाराम महाविद्यालयातील जागेची पाहणी केली. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या जागांची प्राथमिक माहिती संकलित केली. जिल्हा प्रशासनाने त्याबाबतची माहिती शासनाला दिली. खासदार संभाजीराजे यांनी राजाराम महाविद्यालयाच्या जागेत उपकेंद्र करावे, असे सांगितले. त्यानुसार शासनाने या जागेची निवड केली आहे. दरम्यान, राजाराम महाविद्यालयातील कमवा व शिका योजनेच्या इमारत परिसरातील दोन एकर जागा ‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी असणार आहे. या इमारतीची रंगरंगोटी आणि परिसराची स्वच्छता शुक्रवारी करण्यात आली आहे. याठिकाणी दोन कर्मचारी नियुक्त करून उपकेंद्राचे काम सुरू करण्यात येईल. शासनाच्या सूचनेनुसार केंद्राबाबतची पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे ‘सारथी’चे निबंधक अशोक पाटील यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
सकल मराठा समाजाच्यावतीने ‘सारथी’च्या उपकेंद्राची मी मागणी केली होती. माझ्या सांगण्यावरून राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात हे केंद्र करण्याचा निर्णय घेत तातडीने कार्यवाही केल्याबद्दल मी सरकारचे कौतुक करतो. या केंद्राची कोल्हापुरात सुरुवात होत असल्याचा आनंद आहे.
- खासदार संभाजीराजे