लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) उपकेंद्र मराठा समाजाला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत मराठा समाजासाठी जे जे करावे लागेल, त्यात महाविकास आघाडी सरकार मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पंतप्रधानांकडे विनंती केली असून, राज्य सरकार मराठा समाजासाठी आवश्यक ते निर्णय घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरातील राजाराम काॅलेजमधील प्री. आय. ए. एस. ट्रेनिंग सेंटरच्या परिसरातील ‘कमवा व शिका’ योजनेच्या इमारतीत शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘सारथी’ उपकेंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महान राष्ट्रपुरुषांच्या केवळ आठवणींचा जागर करून चालणार नाही. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून जाण्याची आवश्यकता आहे. मागील शनिवारी खासदार संभाजीराजे यांच्यासोबत बैठक घेऊन ‘सारथी’चे उपकेंद्र कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आठ दिवसांत आवश्यक ती पावले उचलत राजर्षी शाहू जयंतीदिवशी हे उपकेंद्र सुरू केले.
खासदार संभाजीराजे म्हणाले, मूक आंदोलनानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक आयोजित करून दिली. त्यांनी बैठकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे ‘सारथी’ला जागा दिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार व संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून आभारी आहोत.
यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ‘सारथी’चे अध्यक्ष अजित निंबाळकर, आदी उपस्थित होते.
---------------------------------------
केवळ आदळआपट करणे म्हणजे नेतृत्व नव्हे !
संघर्ष व संवाद कधी साधायचा हे ज्याला कळले तोच खरा नेता असतो. केवळ आदळआपट करणे म्हणजे नेतृत्व नव्हे. खासदार संभाजीराजे यांनी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येताना राज्य शासनाबरोबर संवाद साधण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. मी शिवसेना पक्षप्रमुख असून, न्यायासाठी रस्त्यावर उतरणे आमच्याही रक्तात भिनले आहे. आम्ही सर्व एकाच विचारांची लेकरे आहोत. संवाद व संघर्ष कधी करायचा हे आम्हांला चांगले कळते, असा टोला ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.
---------------------------------------
राजर्षींचे राज्य म्हणजे गुणसंपदेचा मळा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहू महाराजांचे राज्य हा गुणसंपदेचा मळा होता. कर्मवीर भाऊराव पाटील, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता ओळखणारे राजर्षी शाहू महाराज हे पहिले लोकराजे होते. त्यांची विद्वत्ता ओळखून महाराजांनी त्यांना मानपत्रे देऊन सन्मान केला.
---------------------------------------
ओबीसी समाजही माझा
मराठा समाजाप्रमाणे ओबीसी समाजही माझा आहे. ज्याप्रमाणे शाहू महाराजांनी दीनदुबळ्यांना ताकद दिली, त्यांची हीच परंपरा राज्य सरकार पुढे नेत आहे. जिथे जे करावे लागेल, ते निश्चित करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
---------------------------------------
आरक्षणाबाबत पंतप्रधानांकडे पाठपुरावा सुरूच
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. म्हणजेच कायद्याची लढाई आपण सोडून दिलेली नाही. आम्ही सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा अधिकार आता राज्यांना नाही, तर तो केंद्र सरकार किंवा राष्ट्रपतींना असल्याचे सांगितले. आपण पाठपुरावा करून समाजाला न्याय द्यावा, अशी विनंती आपण केली आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
-----------------------------------------------------
फोटो : २६ कोल्हापूर ०१
ओळी : कोल्हापुरातील राजाराम काॅलेजच्या प्री-आय.ए.एस. ट्रेनिंग सेंटरच्या ‘कमवा व शिका’ उपक्रमाच्या इमारतीत शनिवारी ‘सारथी’च्या उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. यावेळी शाहू छत्रपती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संभाजीराजे, आमदार ऋतुराज पाटील, वसंत मुळीक, आदी मान्यवर उपस्थित होते.
-----------------------------------------------------
फोटो : २६ कोल्हापूर ०२
कोल्हापुरातील राजाराम काॅलेजमधील प्री-आय.ए.एस. ट्रेनिंग सेंटरच्या ‘कमवा व शिका’ इमारतीमध्ये शनिवारपासून सुरू करण्यात आलेल्या ‘सारथी’च्या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डावीकडून आमदार ऋतुराज पाटील, खासदार संजय मंडलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे, शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.