चंदगड : नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरणाच्या कामात ठेकदाराकडून २५ हजारांची लाच घेताना चंदगड पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता महिलेस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे (रा. सध्या हनुमाननगर, बेळगाव) हिला अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराकडून घुल्लेवाडी येथे नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरणाचे काम सुरू आहे. त्या कामाचे १२ लाख मंजूर बील काढण्यासाठी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता सुभद्रा कांबळे यांनी ३ टक्के दराने ३३ हजारांची मागणी केली होती. काल, गुरुवारी तडजोडीअंती २५ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपअभियंता महिलेस सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले. सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकाॅ विकास माने, सुनील घोसाळकर, पोना सचिन पाटील, पूनम पाटील, विष्णू गुरव यांनी केली.
Kolhapur: २५ हजारांची लाच स्वीकारताना उपअभियंता महिलेस रंगहाथे पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 3:58 PM