कोल्हापूर : मटक्याच्या गुन्ह्यात लाच मागितल्याप्रकरणी पसार संशयित उपनिरीक्षक अभिजित गुरव व पोलीस कॉन्स्टेबल रोहित पोवार यांचा शोध सुरू आहे. आणखी काही पोलीस चौकशीच्या रडारवर आहेत. अटक संशयित पंटर रोहित सोरपला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावल्याचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.मटक्याच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी व अटकेची कारवाई टाळण्यासाठी मटका व्यावसायिक तक्रारदारांकडे राजारामपुरी गुन्हेशोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव व पोलीस रोहित पोवारने लाचेची मागणी केली. पहिला २० हजारांचा हप्ता दिल्यानंतर दुसरा उर्वरित ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी पंटर रोहित सोरपला रंगेहाथ पकडले. पंटरसह उपनिरीक्षक गुरव, पोलीस पोवार या तिघांवर गुन्हा नोंदविला.दरम्यान, गुरव व पोवार हे दोघेही गुन्हा घडल्यापासून गायब आहेत. पोलिसांनी शनिवारी रात्रीच पोवार याच्या पीरवाडीतील घराची तातडीने झडती घेतली; पण तेथे काही संशयास्पद आढळले नसल्याचे उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले; तर उपनिरीक्षक गुरव याच्या रुक्मिणीनगरातील घराला कुलूप असल्याने त्याची घरझडती घेता आली नाही.
हे संशयित दोघेही पोलीस रविवारी दिवसभर पोलीस ठाण्यातही हजर नव्हते; तसेच विभागातही हजर झालेले नाहीत. विभाग त्यांचा कसून शोध घेत आहेत.एक पोलीस, दोन पंटर रडारवरलाच प्रकरणातील मोबाईल संभाषण व चौकशीअंती आणखी एक गुन्हे प्रकटीकरणाची आवड असणारा एक पोलीस व दोन पंटर संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांनाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.चौकशीसाठी पुणे विभागाने पुढे यावे...लाच प्रकरणात उपनिरीक्षक संशयित आरोपी आहे. आणखी काही वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा खोलवर तपास करून, पाळेमुळे खोदून पर्दाफाश करण्यासाठी पुणे विभागानेही पुढे येण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे.