उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीत स्वाभिमानीचे रमेश कुबेर मगदूम यांची निवड झाली. शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच कलीमुन नदाफ होत्या. यावेळी महाविकास आघाडीच्या दीपिका बंडेश कोळी यांचा मगदूम यांनी ९ विरुध्द ८ मतांनी पराभव केला.
दरम्यान, काँग्रेसच्या गणपतराव पाटील गटाचे सदस्य अॅड. हिदायत नदाफ यांनी स्वाभिमानीला पाठिंबा दिल्याने सरपंच महाविकास आघाडीचा तर उपसरपंच स्वाभिमानीचा अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली. यावेळी फुटीर सदस्य नदाफ म्हणाले, मी एका महिन्यातच उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. सरपंच व आघाडीच्या चुकीच्या कारभारावर असमाधानी होतो. पक्षीय उड्या मारण्यापेक्षा आम्ही एकत्रित राहून महाविकास आघाडीसोबत काम करु, असे ग्रामपंचायत सदस्य सलीम पेंढारी यांनी सांगितले. एकंदरीत सहा महिन्यातच सदस्यांच्यात एकमत नसल्याने अल्पमतात येण्याची नामुष्की महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आली आहे.
यावेळी मंडल अधिकारी एस. ए. सुतार, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, तलाठी सचिन चांदणे यांच्यासह दोन्ही आघाडीचे सदस्य उपस्थित होते.
----------------------------
अपात्रतेवर बोलण्यास नकार
हिदायत नदाफ महाविकास आघाडीकडून निवडून आले असताना त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी, म्हणून स्वाभिमानीने ईर्षेने पुढाकार घेतला होता. परंतु, त्यांनाच स्वाभिमानीने आघाडीत घेतल्याने अपात्रतेच्या कारवाईवर बोलण्यास स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी नकार दिला.
कोट - नदाफ यांना पहिल्याच टप्प्यात उपसरपंचपद दिले होते. परंतु, त्यांनी कोणत्याही कारणाशिवाय राजीनामा दिला. त्यामुळे पुन्हा त्यांना संधी देण्यास आघाडीच्या नेत्यांनी व सदस्यांनी विरोध केला.
- कलीमुन नदाफ, सरपंच
फोटो - २५०६२०२१-जेएवाय-०१-रमेश मगदूम