कोल्हापूर : मोबाईल वापरत असल्याची टीप तुरुंग अधिकाऱ्यांना दिली म्हणून जर्मन टोळीच्या म्होरक्यासह १४ जणांनी तुरुंगातील सुभेदारासह सराईत गुंड लहू रामचंद्र ढेकणे याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी तुरुंग सुभेदार उमेश शामू चव्हाण (वय ५१, रा. चव्हाण कॉलनी, कळंबा) हेही गंभीर जखमी झाले आहेत. कळंबा तुरुंगातील शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कळंबा कारागृहाच्या सर्कल नंबर ७ मधील बरॅक नंबर ४ मध्ये घडली.याप्रकरणी जर्मन टोळीचा म्होरक्या मोक्यातील आरोपी सुनील अशोक कोडुगळे याच्यासह बसवराज महादेव तेली, उमर इसाक बागवान, जमीर सलिम शेख, उमर अमीर खान मुल्ला, संग्राम बाबू रणपिसे, अक्षय अशोक घाटगे, किरण आप्पासाहेब वडर, अफताब जमाल मोमीन, शाहरुख आझाद शेख, विजय सुरेश जाधव, तन्वीर मुसा पठाण, दत्तात्रय काशीनाथ अस्वरे अशा १४ जणांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, कळंबा तुरुंगाची गेल्या १५ दिवसांपासून तपासणी सुरू आहे. या तपासणीत जवळपास ३० हून अधिक मोबाईल, चार्जर आणि पेनड्राईव्ह सापडले होते. संशयित आरोपीला कैदी लहू ढेकणे यानेच ही माहिती तुरुंग प्रशासनाला दिल्याचा संशय होता. यामुळे त्यांनी कट रचून शनिवारी सकाळी सर्कल क्रमांक ७ मधील बरॅक नंबर ४ मधील लहू ढेकणे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. १४ संशयितांनी लहू ढेकणेला घेरून त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.याची माहिती सुभेदार उमेश चव्हाण यांना मिळताच ते लहूला सोडविण्यासाठी धावले, परंतु हल्लेखोरांनी चव्हाण यांनाच बेदम मारहाण केली. त्यात त्यांच्या उजव्या हाताचे मधले बोट तुटले असून गंभीर जखमी झाले आहेत. अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांना त्यांच्या तावडीतून ढेकणे आणि चव्हाण यांची सुटका केली. शनिवारी रात्री उशिरा याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टीप दिल्याचा राग; कोल्हापुरातील कळंबा कारागृहात गुंडासह सुभेदारास बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 4:51 PM