कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाणार आहे. उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी मंगळवारी माजी आमदार सत्यजित पाटील आणि डॉ. सुजित मिणचेकर यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. सत्यजित पाटील गटाचे सदस्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील हे राजीनामा द्यायला तयार नसल्याने आता मुख्यमंत्र्यांकडूनच सत्यजित पाटील यांना त्यांचा राजीनामा घेण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. गोकूळची झालेली निवडणूक व विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजीनामा देण्याचा गुंता तयार झाला आहे.
जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या तीनही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय गेले दोन महिने गाजत आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर येऊन गेले, पण राजीनामे काही झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे संपर्कमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृहावर सकाळी पदाधिकाऱ्यांशी आणि माजी आमदारांशी चर्चा केली. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी वस्तुस्थिती सांगितली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हे तीनही पदाधिकारी असून, आता त्यांनी राजीनामे दिल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांना ही पदे द्यावी लागतील. जिल्हा परिषद सभागृहाची मुदत संपत आली असून, या तिघांचे राजीनामे झाल्याशिवाय काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा होऊ शकत नाही. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, ‘गोकूळ’चे संचालक अजित नरके उपस्थित होते.
चौकट
गोकूळ आणि विधानसभेचा संदर्भ
माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सामंत यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. शाहूवाडी तालुक्यात त्यांची लढाई जनसुराज्य पक्षाशी आहे. ‘गोकूळ’च्या निवडणुकीत आपण दोन्ही काॅंग्रेससोबत गेलो असताना ऐनवेळी जनसुराज्य पक्षाला आघाडीत घेऊन दोन जागा देण्यात आल्या. विधानसभेला या सगळ्यांची आपल्याला अडचण होणार आहे. त्यामुळे ताकद देणारे हे एक तरी पद आपल्या कार्यकर्त्यांकडे राहू दे, अशी मागणी त्यांनी केल्याचे समजते. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही सामंत यांच्याशी चर्चा केली.
चौकट
पक्षप्रमुख सांगतील तसे होईल
जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या बदलाबाबत चर्चा झाली. सर्व संबंधितांशी मी बोललो आहे. त्यांच्या काही अडचणी आहेत, प्रश्न आहेत, ते मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार आहे. त्यानंतर ते जो निर्णय देतील तो सर्वांना बंधनकारक असेल, असे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
०८०६२०२१ कोल शिवसेना ०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव आणि माजी आमदार सत्यजित पाटील उपस्थित होते.