मुंबईतील बैठकीत निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना वीजदरात प्रतियुनिट ७५ पैसे सवलत देण्याचा प्रलंबित विषय आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्याचा निर्णय झाला. वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संकटात सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना ७५ पैसे सवलत देण्याच्या विषयासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री व वस्त्रोद्योग मंत्री यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडली.
यामध्ये हा विषय मंत्रिमंडळामध्ये मंजुरीसाठी घेण्याचा निर्णय झाला. तसेच २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागधारकांना जाहीर १ रुपयांची सवलत व कर्जावरील व्याज दरात ५ टक्के व्याज सवलत देणे, यंत्रमागधारकांना मल्टीपार्टी वीज जोडणीची अंमलबजावणी यासंदर्भात चर्चा झाली, यासह यंत्रमाग व्यवसायातील अन्य प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात कोल्हापूर किंवा इचलकरंजीत बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. बैठकीस नगरसेवक राहुल खंजिरे, मदन कारंडे, रवींद्र माने, सागर चाळके, सतीश कोष्टी यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
चौकट
साडेचार कोटींचा लाभ
शहरात २७ अश्वशक्तीवरील साधारण दीड हजार यंत्रमागधारक आहेत. शासनाकडून ७५ पैशांची सवलत लागू झाल्यास महिन्याला किमान साडेचार कोटी रुपयांचा लाभ यंत्रमागधारकांना मिळणार आहे.
फोटो ओळी
२३०६२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजी वस्त्रोद्योग व्यवसायाबाबत मुंबई येथे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी नगरसेवक राहुल खंजिरे, मदन कारंडे, सागर चाळके, सतीश कोष्टी, आदी उपस्थित होते.