इचलकरंजी : देशात वर्षाला सरासरी पाच लाख अपघात होतात. त्यातील सुमारे दीड लाख लोक मरण पावतात. म्हणजेच दिवसाला ४००, तर तासाला १७ लोक अपघातात ठार होतात. अन्य सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूमध्ये सर्वाधिक तरुण अपघातात ठार होतात. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, सर्वांनीच स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमात वाहतुकीच्या नियमांबाबतचा विषय आवश्यक आहे, असे मत श्रीपाल ओसवाल (कºहाड) यांनी व्यक्त केले.
येथील घोरपडे नाट्यगृहात आयोजित वाहतुकीचे नियम व चालकांच्या चुकामुळे होणारे अपघात याविषयी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ओसवाल यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करीत अनेक महत्त्वाचे मुद्दे आकडेवारीसह स्पष्ट केले. त्यामध्ये देशातील होणाºया अपघातात पादचारी, सायकलस्वार व मोटारसायकलस्वार यांच्या मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के आहे, तर कार व इतर अपघातात मृत्यूंचे प्रमाण १७ टक्के आहे. त्यामध्ये हेल्मेट न वापरल्याने डोके फुटून झालेले अपघात ८५ टक्के आहे. तसेच कार अपघातातील बहुतांशी मृत्यू सिटबेल्ट न लावल्याने झाल्याचे आढळते.
देशात विविध आजाराने होणाºया मृत्यूच्या प्रमाणापेक्षा अपघातात ठार होणाºयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून वाहतुकीचे नियम पाळणे, तसेच शिस्तबद्धता आल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. अनेक देशांमध्ये वाहतुकीविषयीचे नियम व कायदे कडक आहेत. तसेच त्याचे तेथील नागरिकांकडून काटेकोरपणे पालनही केले जाते. आपणही जागरूकपणा आणल्यास हे प्रमाण दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, असेही ओसवाल यांनी स्पष्ट केले.
रोटरीचे अध्यक्ष मुकेश जैन यांनी स्वागत व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास पोलीस अधिकारी, रोटरीचे पदाधिकारी, टेम्पोचालक, बसचालक, रिक्षाचालक, स्कूल बस, विद्यार्थी वाहतूक, आदींच्या चालकांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सागर पाटील व सत्यनारायण धूत यांनी सूत्रसंचालन केले. संजय घायतिडक यांनी आभार मानले.इचलकरंजी येथे वाहतूक सुरक्षा सप्ताहांतर्गत रस्ते सुरक्षा याविषयी श्रीपाल ओसवाल यांनी मार्गदर्शन केले.