कोल्हापूर : ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील खुल्या जागांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी (दि. ३०) होणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या दोन वर्षांपासून हा खुल्या जागांचा प्रश्न ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी याबाबत सविस्तर पत्र तयार करून ग्रामपंचायतींना पाठविण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना केल्या होत्या. तसेच विशिष्ट तक्त्यामध्ये माहितीही मागविण्याच्या सूचना दिल्या होत्या.यानंतर अनेक गटविकास अधिकाऱ्यांच्या सातत्याने मागे लागल्यानंतर बहुतांश तालुक्यांची माहिती ग्रामपंचायत विभागाकडे एकत्र झाली आहे. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी करवीर तालुक्यातील ग्रामसेवकांची एक खास बैठक जिल्हा परिषदेमध्ये गेल्या वर्षी घेतली होती. डॉ. खेमनार बदलून गेल्यानंतर पुन्हा या विषयाचा पाठपुरावा केला गेला नाही.आता याबाबत ‘लोकमत’ने पुन्हा विचारणा केल्यानंतर मित्तल यांनी राजेंद्र भालेराव यांच्याक डून खुल्या जागांबाबतचे नियम, अटी आणि शर्ती यांची माहिती मागविली आहे. तसेच याबाबत महाराष्ट्र शासनाचे जे जे आदेश आहेत, ते संकलित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
याचाच पुढचा टप्पा म्हणून दर महिन्याच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या समन्वय समिती बैठकीमध्ये आता खुल्या जागांचा आढावा घेण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये हा आढावा घेतला जाणार असल्याने खुल्या जागा सोईने ताब्यात घेणाऱ्या किंवा न घेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कारभाराला यामुळे शिस्त लागणार आहे.
परदेशी संशोधक विद्यार्थिनीलाही सांगितले महत्त्वअमन मित्तल यांच्याशी आपत्ती व्यवस्थापनाबाबत चर्चा करून माहिती घेण्यासाठी जर्मनीहून एक संशोधक विद्यार्थिनी गेल्या पंधरवड्यात आली होती. तिच्याशी चर्चा करतानाही मित्तल यांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये खुल्या जागांचे महत्त्व स्पष्ट केले. जेव्हा एखाद्या वसाहतीमध्ये एखादी दुर्घटना घडेल तेव्हा तेथे खुली जागा नसणे तोट्याचे ठरू शकते. वसाहतीमधील नागरिकांनाही ही खुली जागा सार्वजनिक वापरासाठी मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘लोकमत’ने अतिशय महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या विषयाची मी प्राथमिक माहिती घेतली. खुली जागा ताब्यात घेण्याबाबत ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र समोर आले आहे. यातून अनेक ग्रामस्थांच्याही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. या जागेवर वसाहतीतील नागरिक, ग्रामपंचायत व पर्यायाने शासनाचा हक्क असल्याने या जागा कुणालाही बळकावता येणार नाहीत. यासाठी कडक पावले उचलली जातील.अमन मित्तलमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर