कोल्हापूर : जिल्ह्यातील भूस्खलन, दरडी कोसळणे आदी आपत्तीबाबत प्राथम्याने ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती आहे ती आणि रस्ते या विषयी महिन्याभरात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भू वैज्ञानिक विभागाला दिले.जिल्ह्यातील 41 गावांमध्ये भूस्खलनाचे प्रकार घडले आहेत. भविष्यात या ठिकाणी अशा घटना घडू शकतात. याबाबत प्रशासकीय आणि समुदाय पातळीवर जाणीव जागृती निर्माण करणे आणि संबंधितांची या आपत्तीला तोंड देण्याची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे.
यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक छत्रपती शिवाजी सभागृहात आज झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी संगणकीय सादरीकरण केले. त्यानंतर वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनीही संगणकीय सादरीकरण करून 2018 आणि 2019 बाबत स्थितीची माहिती दिली.जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, ज्या ठिकाणी मनुष्य वस्तीला धोका आहे ती ठिकाणे प्राथम्याने निवडावीत. त्यानंतर रस्ते आणि इतर ठिकाणांचे सर्वेक्षण करावे. याबाबत एक महिन्यात सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा. भूवैज्ञानिक विभागाने यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला (जीएसआय) कळवून पाठपुरावा करावा.या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, प्रातांधिकारी अमित माळी, तहसिलदार पन्हाळा रमेश शेंडगे, भुदरगड तहसिलदार अमोल कदम, शाहूवाडी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, पन्हाळा गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर आदी उपस्थित होते.