इचलकरंजी : गेल्या दोन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे यंत्रमागधारकांना ५ वर्षे कर्जावरील व्याज अनुदान देणे व वीजदरातील सवलत देणे याबाबत निर्णय घेण्यासाठी आवश्यक प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर ठेवण्याचे आदेश शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी यंत्रमागधारकांच्या कर्जावर पाच वर्षांसाठी ५ टक्के व्याज अनुदान व वीजदरात प्रतियुनिट एक रुपये सवलत देण्याची घोषणा पावसाळी अधिवेशन सन २०१६ मध्ये केली होती. मात्र, हा प्रस्ताव प्रलंबित राहिल्यामुळे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार हाळवणकर यांनी वस्त्रोद्योग मंत्री यांच्याविरोधात हक्कभंग सूचना दाखल करण्याची अथवा विधानसभेत आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. त्यावर वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांनी तत्काळ कार्यवाही करत या प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी देण्याची विनंती करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आगामी उच्चस्तरीय समितीसमोर ठेवण्याचे आदेश दिले. राज्यातील वस्त्रोद्योगासाठी शासनाने केलेल्या घोषणेची पूर्तता करण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करताना वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख व सुरेश हाळवणकर. यावेळी अनिल बाबर, डॉ. सुजित मिणचेकर, अबू आझमी उपस्थित होते.
यंत्रमाग अनुदान प्रस्ताव उच्चस्तरीय समितीला सादर करा
By admin | Published: March 25, 2017 12:17 AM