कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या हल्ल्यामध्ये कैदी सुनील मारुती माने (वय ३५, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गृह खात्याने चौकशीचे आदेश दिले होते. येथील सुरक्षेचा व कैद्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून अहवाल कारागृह पोलीस महासंचालकांना मंगळवारी सादर केला आहे. या संदर्भात कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.कळंबा कारागृहात खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेला कैदी सुनील माने याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली होती. संशयित कैदी परमेश्वर ऊर्फ देवा नानासाहेब जाधव (वय २४, रा. कोडेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला सुपारी देऊन हा खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे.
सुपारी देणारे कोण? जाधवला कारागृहातील काही अधिकारी, कर्मचारी, कैदी यांनी सहकार्य केले आहे काय, हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. शिक्षा भोगण्यास आलेल्या कैद्यांचेच कारागृहात दिवसाढवळ्या खून होऊ लागल्याने कळंबा कारागृहाची सुरक्षा राज्यभर चर्चेचा विषय ठरली. गृहखात्याने कारागृहाच्या सुरक्षेचे चौकशीचे आदेश देताच पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी कारागृहाला भेट देऊन चौकशी केली.
घटनेची माहिती घेत संशयित कैद्याकडे दोन तास कसून चौकशी केली. येथील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाबही घेतले. बराकीमधून कैदी चहाला बाहेर पडले त्यावेळी बराकीच्या आसपास कोणते सुरक्षारक्षक होते, त्यांच्याकडेही चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. कारागृह उपमहानिरीक्षक साठे यांनी चौकशीचा अहवाल मंगळवारी कारागृह पोलीस महासंचालकांना सादर केला आहे. खूनप्रकरण कोणाला भोवले जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.