कोल्हापूर : राज्यात रोज सरासरी ५० लाख लिटर दूध शिल्लक राहत असल्याने त्याचा फटका दूध संघांना बसत आहे. शिल्लक पावडरसाठी अनुदान देण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहीती राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.मंत्री केदार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी गोकूळच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील शिल्लक दुधाचा आढावा घेतला जात असून त्यानंतर पावडर अनुदानाबाबत निर्णय घेतला जाईल, असे मंत्री केदार यांनी सांगितले.
गोकूळचे संचालक प्रकाश पाटील व रयत संघाचे संचालक सचिव विश्वास पाटील यांनी मंत्री सुनील केदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दूध व्यवसायासमोरील अडचणी व संघाच्या प्रलंबीत प्रस्तावांना मंजुरी द्यावी, या मागणीचे निवेदनही गोकूळच्या वतीने मंत्री केदार यांना देण्यात आले. गोकूळचे डेअरी व्यवस्थापक ए. वाय. चौधरी, संघाचे बोर्ड सचिव एस. एम. पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.