लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेले वर्षभर पडद्याआड राहून कोरोनाच्या आकडेवारीच्या संकलनाचे शिवधनुष्य पेलण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या आठ जणांच्या गटाने बजावली आहे. रात्री-अपरात्री कधीही उठून ही आकडेवारी संकलित करण्यापासून ते मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज करण्याच्या कामगिरीत हा गट कुठेही कमी पडला नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि आधीपासूनच साथरोगाबाबत माहितीचे संकलन करणाऱ्या या आठजणांवर कोरोनाची आकडेवारी संकलित करण्याची जबाबदारी पडली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अंतर्गत कार्यरत असणारी २१ रुग्णालये, जिल्हा परिषदेचे दवाखाने, विश्वस्त आणि खासगी रुग्णालये या सर्वांशी संपर्क साधत ही आकडेवारी गोळा केली जाऊ लागली. सुरुवातीच्या काळात माहिती संकलित करण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे प्रसारमाध्यमांनाही वेळेत माहिती मिळत नव्हती. परंतु त्यासाठी या विभागापेक्षा तत्कालीन काही अधिकाऱ्यांमध्ये नसलेला समन्वय कारणीभूत होता.
परंतु, नंतर त्यामध्ये सुधारणा झाली आणि आजतागायत या विभागामार्फत योग्य आकडेवारी पुरविण्याचे काम नेटाने सुरू आहे. येणारी आकडेवारी, त्याची टक्केवारी, रुग्ण, पॉझिटिव्हिटी, मृत्यूदर, वयोगटानुसार विभागणी अशा विविध नमुन्यांमध्ये ही माहिती संकलित केली जाते. त्याचे विश्लेषण केले जाते. ज्या त्या ठिकाणाहून कोविड पोर्टलवर भरलेल्या आकडेवारीचे विश्लेषण करण्याचीही जबाबदारी या गटाकडे आहे.
चौकट
अहारोत्र काम करणारा हा गट
जिल्हा सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. उषादेवी कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हा गट कार्यरत आहे. यामध्ये जिल्हा साथरोग तज्ज्ञ डॉ. संतोष तावशी, जिल्हा सांख्यिकी व्यवस्थापक शरद जाधव, डेटा ऑपरेटर इंद्रजित तडवळे, आरोग्य सहाय्यक अल्ताफ शेख, आरोग्य पर्यवेक्षक डॉ. एफ. एम. म्हाब्री, साथरोग अधिकारी डॉ. शुभांगी रेंदाळकर, सुदर्शन राजमाने यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. मात्र, केवळ फ्रंटवर नाहीत म्हणून ही मंडळी पडद्याआडच राहिली आहेत.
चौकट
रात्री १ वाजता आकडेवारी तयार
कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांनी कोल्हापूर भेटी दिल्या. अनेकांचे दौरे अचानक ठरले. रात्री उशिरा मंत्री कोल्हापुरात दाखल व्हायचे आणि सकाळी साडे आठ वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घ्यायचे. त्यांच्यासाठी अद्ययावत आकडेवारी तयार करण्याचे काम रात्री एक, दीडपर्यंत बसून या सर्वांनी अनेकवेळा केले. अनेकदा दुपारी या मंडळींना जेवायला घरीही जायला मिळायचे नाही. यातील पाच जणांची नेमणूक कंत्राटी तत्त्वावर आहे.
चौकट
डेंग्यूसह अन्य आजारांकडेही लक्ष
केवळ कोरोनाच नव्हे तर गेल्यावर्षी काही तालुक्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले, गॅस्ट्रोची लागण झाली. तेव्हा आकडेवारी गोळा करणारी ही मंडळी रात्री उठून त्या त्या गावातही गेली. साथ रोग सर्वेक्षणाचे काम असल्याने त्यांनी या आपल्या नियमित कामाकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही.