कोल्हापूर : शेतीसाठी आपण नदीचे पाणी वापरतो, त्यातून पीक घेतो व त्यामुळे आपला संसार चालतो. मग आपण पाणीपट्टी भरली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाल्याने कोल्हापूर पाटबंधारे विभागाने यंदा उच्चांकी वसुली केली आहे. पाटबंधारे विभागाची यंत्रणाही चांगली राबल्याने वसुलीत भर पडली आहे. सिंचन पाणीपट्टी ९ कोटी ३४ लाख, तर बिगर सिंचन २६ कोटी रुपये वसूल झाले आहेत.
इतकी चांगली वसुली झाल्याबद्दल कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांचे वरिष्ठ कार्यालयाकडून अभिनंदन करण्यात आले.
गतवर्षी कोरोनामुळे वसुलीस मोठा फटका बसला होता. तो अनुभव पाठीशी असल्याने यावर्षी डिसेंबरपासूनच वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली. यंदा साखर कारखान्यांकडून त्यांच्याकडील थकबाकी व देय बिलांची पूर्तता चांगल्या पद्धतीने झाली. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुलीस कायमच चांगला प्रतिसाद मिळतो; परंतु त्यांना अजूनही पाणीपट्टी भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाने गेल्या दोन वर्षांत प्रबोधनाची मोहीम राबवली. पाणीपट्टीचा हेक्टरी दर १,१२२ रुपये आहे. शंभर गुंठ्याचा एक हेक्टर म्हणजे गुंठ्याला १२ रुपयेच भरायचे आहेत. त्या एका गुंठ्यातून तुम्ही टनभर ऊस काढता. कुठेही गेलात तर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीला लिटरला २० रुपये मोजावे लागतात आणि पाटबंधारे विभाग मात्र १,१२२ रुपयांत तुमच्या एक हेक्टर जमिनीसाठी पाणीपुरवठा करतो. त्यातून पाटबंधारे प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती केली जाते. ही भूमिका शेतकऱ्यांना पटल्याने ते स्वत:हून पाणीपट्टी भरत असल्याचे कार्यकारी अभियंता बांदिवडेकर यांनी सांगितले.
...अशी झाली वसुली
सिंचन : ९ कोटी ३४ लाख
बिगर सिंचन : २६ कोटी
गतवर्षीची वसुली
सिंचन : ५ कोटी ५० लाख
बिगर सिंचन : २२ कोटी
...असे आहेत दर
सिंचनासाठी : गुंठ्याला फक्त १३ रुपये
औद्योगिकसाठी : प्रक्रिया उद्योगासाठी : १३ रुपये (प्रतिहजार लिटर)
जिथे पाणी हा कच्चा माल म्हणून वापरले जाते तिथे : २८८ रुपये (प्रतिहजार लिटर)
पिण्यासाठी : एक हजार लिटरसाठी
ग्रामपंचायत : फक्त ३६ पैसे
नगरपालिका : ४३ पैसे
महापालिका : ६० पैसे
मनपाची थकबाकी जास्त..
कोल्हापूर महापालिकेची थकबाकी कायमच असते; परंतु त्यातूनही मार्ग काढण्यात येत आहे. पाटबंधारे विभाग महापालिकेचेही काही देणे लागतो. ती रक्कम थकीत पाणीपट्टीपोटी जमा करून समायोजन करण्याचा प्रयत्न आहे.