पेठवडगाव : हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काॅंग्रेसने महाआघाडीतील मित्रपक्षांच्या सहकार्यातून १२ ठिकाणी सत्ता संपादन केली आहे. तर अन्य ठिकाणी स्थानिक पातळीवरील सोयीस्कर आघाड्याची सत्ता आली आहे. बहुमतांचा आदर ठेवून तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही आमदार राजू आवळे यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात, असे आवाहन केले होते. यास मौजे तासगावने प्रतिसाद दिला. तर किणी, दुर्गेवाडी यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले होते. कुंभोज, नेज, तिळवणी, लाटवडे, खोची, मनपाडळे, बुवाचे वठार, जंगमवाडी आदी ठिकाणी महाविकास आघाडीने यश संपादन केले आहे. उर्वरित ठिकाण स्थानिक कार्यकर्त्यांच्या व महाआघाडीच्या आग्रहाखातर स्थानिक आघाड्या करून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. यास परवानगी देण्यात आली होती. या ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी १८ ग्रामपंचायतीत काॅंग्रेस प्रणित व महाआघाडीचे उमेदवार मताधिक्याने विजयी झाले आहेत. निकालांचे विवेचन पाहिले असता, काॅंग्रेस सहमहाविकास आघाडीचे उमेदवार चांगल्या मताधिक्क्याने विजयी झाल्याचे दिसत आहेत.