गारगोटी, : पित्तमपूर (मध्य प्रदेश) येथे महिंद्रा कंपनीच्यावतीने आयोजित गो-ग्रीन अॅवार्ड स्पर्धेत पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अभेद्य टीमने सादर केलेल्या ‘वज्र’ रेसिंग कार मॉडेलला देशात प्रथम क्रमांक मिळाला. देशातील २०० मॉडेलचा या स्पर्धेत सहभाग होता. गारगोटीतील वृत्तपत्र विक्रेते ज्ञानेश्वर वेदांते यांचा सुपुत्र ॠतुराज वेदांते याने अभेद्य टीमचे नेतृत्व केले.
महिंद्रा कंपनीच्यावतीने पित्तमपूर येथे सोसायटी ऑफ अॅटोमोटिव्ह इंजिनिअरर्स आयोजित बाजा गो-ग्रीन स्पर्धेत हे मॉडेल सादर केले होते. यासाठी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अभेद्य टीमधील विद्यार्थ्यांनी तब्बल चार महिने अथक प्रयत्न केले. त्यांनी अडचणीच्या व डोंगराळ भागात वापरासाठी ‘वज्र’ नावाचे रेसिंग कार मॉडेल विकसित केले होते. या मॉडेलचे इंजीन ३०५ सीसीचे आहे. इंजीन व शॉकॉब्सर परदेशी बनावटीचे तर इतर सर्व साहित्य स्वदेशी वापरले होते. यावर्षी ऑनलाईन सादरीकरण स्पर्धा झाली. यात त्यांच्या ‘१२७ वज्र’ या मॉडेलने सर्वात कमी प्रदूषण या निकषावर देशात प्रथम क्रमांक पटकाविला. गतवर्षी याच टीमने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकाविला होता. तर अमेरिकेतील अॅरिझोना या शहरात झालेल्या जागतिक स्पर्धेत पंचविसावा क्रमांक पटकाविला होता.
सलग दोन वर्षे टीम अभेद्यने ऑफ रोड व्हेईकल निर्मितीवर भर दिला होता. प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी दोन मॉडेल विकसित केली. दोन्ही मॉडेल देशपातळीवरील सपर्धेत त्यांना नावलौकिक मिळवून देणारी ठरली आहेत. यातील कॅप्टन ॠतुराज हा वृत्तपत्र विक्रेते ज्ञानदेव वेदांते यांच्या मुलगा आहे. त्याच्या नेतृत्वाखालील टीमने यश मिळविल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. त्यांना मॅकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. आर. पाटील, प्रा. एस. जी. काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कोट...
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमधील ज्ञान व कौशल्याला संधी देणारी ‘एम-बाजा’ ही देशपातळीवरील मोठी स्पर्धा आहे. सलग दोन वर्षे मेहनत घेऊन आमच्या मेकॅनिकल टीम अभेद्य देशपातळीवर यश मिळविले आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. - ऋतुराज वेदांते कॅप्टन, टीम अभेद्य
फोटो : गारगोटी : गो-ग्रीन स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थ्यांची टीम अभेद्य. समवेत मार्गदर्शक डॉ. के. आर. पाटील, प्रा. एस. जी. काळे. कॅप्टन ॠतुराज वेदांते.