कोल्हापूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करताना अनेक धक्कादायक प्रसंग अनुभवावयास आले. तेथील आदिवासी नागरिकांमध्ये प्रबोधन करून त्यांच्या मनातून नक्षलवाद्यांची भीती काढून टाकली. त्यामुळे तेथे नक्षलवाद कमी करण्यामध्ये आपल्याला यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.डॉ. देशमुख यांनी पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी मंगळवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, उपवृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी स्वागत केले. डॉ. देशमुख म्हणाले, ‘गडचिरोलीमध्ये काम करताना खूप शिकायला मिळाले. नक्षलवाद्यांची दहशत असलेला हा जिल्हा आहे. या ठिकाणी काम करताना नक्षलवाद्यांचे मोठे आव्हान आहे. मात्र, नक्षलवाद्यांच्या प्रत्येक मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्या उलट आम्ही मोहिमा आखत गेलो. आदिवासींमध्ये प्रबोधनावर भर देऊन त्यांच्या मनातील नक्षलवाद्यांची भीती दूर केली. लोकांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करून दिला. आपला विकास कशात आहे, याची जाणीव लोकांना करून दिली. त्यामुळे येथील नक्षलवाद कमी करण्यामध्ये यश आले.कोल्हापुरातकाम ही संधी..कोल्हापूरची जनता प्रशासनाबद्दल आदर बाळगणारी आहे. लोक जागरूक आहेत. आंदोलन करीत असले तरी त्यांचा प्रशासनावर विश्वास आहे. या ठिकाणी चांगले काम करून दाखविण्याची संधी मिळाली असल्याचा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
गडचिरोलीत नक्षलवाद कमी करण्यात यश: अभिनव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 1:02 AM