गडहिंग्लज :
आंबेओहळ प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गिजवणेच्या पश्चिमेला असणाऱ्या ओढ्याचे पाणी शेतवडीतील गोठ्यात शिरले. त्यामुळे या गोठ्यात गायी व म्हैशी मिळून ४० जनावरे संकटात सापडली होती. मात्र, तरुणांनी प्रसंगावधान राखून दाखविलेल्या शौर्यामुळे या मुक्याप्राण्यांना वाचविण्यात यश आले.
गिजवणेच्या पश्चिमेला डॉ. रवींद्र हत्तरकी यांचा जनावरांचा गोठा आहे. जोरदार पाऊस व यंदा नव्याने पाणी साठवण्यात आलेल्या आंबेओहळ प्रकल्पातूनही पाणी सोडण्यात आल्याने ओढ्याचे पाणी हत्तरकी यांच्या जनावरांच्या गोठ्यात शिरले.
गडहिंग्लज पालिकेच्या रेस्क्यू टीमने व गावातील धाडसी तरुणांनी जीव धोक्यात घालून छातीभर पाण्यातून जाऊन पहिल्यांदा दोरखंड बांधला. त्यानंतर दोरखंडाच्या सहाय्याने एक-एक जनावरे बाहेर काढली.
दरम्यान, अखेरची दोन जनावरे बाहेर काढत असताना अचानक पाण्याचा दाब व पाण्याची पातळी वाढल्याने बचाव कार्यातील तरुण व दोन जनावरे वाहून जाऊ लागले. मात्र, पालिकेच्या रेस्क्यू टीमने प्रसंगावधान राखून यांत्रिक बोटीच्या सहाय्याने दोन जनावरे व बचाव कार्यातील तरुणांना बाहेर काढण्यात यश मिळविले.
या मोहिमेत भरत पाटील, नितीन पाटील, अमित देसाई, रमेश पाटील, आकाश पाटील, अमित दळवी, भूषण गायकवाड, सिद्धू चौगुले, तुका लष्करे, शीतल कमते, ज्ञानेश्वर जाधव, सागर शिंदे, राजू पोडजाळे, विकास कातकर, संदीप बरकाळे, अजय बुगडे, धीरज पोवार, आकाश कडूकर, विशाल चव्हाण, राकेश ढेरे, प्रथमेश बांदेकर, विनायक चव्हाण, रणजित फराकटे, सिद्धार्थ मगदूम, भैरू म्हेत्री, अमृत चौगुले, सोनल हुंडुरगे, अनिकेत गायकवाड, रफिक म्हाबरजी, संतोष पाटील, संतोष चव्हाण, अभिजित पाटील, विजय काळे, गणेश कळेकर, संजय पत्की, महोदव कुंभार, पांडुरंग बरकाळे यांनी हे मोहीम फत्ते केली.
फोटो ओळी : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे महापुराच्या पाण्यात अडकलेल्या जनावरांना बाहेर काढताना तरुण कार्यकर्ते.
क्रमांक : २५०७२०२१-गड-०२