कोल्हापूर : चाकू लागल्याने आतड्याला गंभीर जखम झाली होती, त्यात कोरोनाची लागण झाल्याने पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाचा जीव धोक्यात आला होता. अनेक खासगी रुग्णालयांत उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र सगळ्यांनी दारातूनच परत पाठविले. मात्र सीपीआरच्या टीमने या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याचे प्राण वाचविले. याबद्दल त्याच्या पत्नीने सीपीआर प्रशासनाचे पत्र लिहून आभार मानले.या तरुणाला चाकू लागल्यानंतर त्याच्या आतड्याला गंभीर इजा झाल्याने तत्काळ ऑपरेशनची गरज होती. त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर शहरातील अनेक खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दोन दिवस धडपड केली. मात्र, संबंधिताची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने कोणीही उपचार केले नाहीत.
वेळेत उपचार होत नसल्याने रुग्णाची प्रकृती ढासळत चाचली. अखेर कुटुंबीयांनी सीपीआरमध्ये दाखल केले. येथे त्यांना डॉ. अनमोल भेटले. त्यांनी रुग्णाची अवस्था पाहून तातडीने यंत्रणा हलवली आणि रात्री बारा वाजता ऑपरेशनसाठी घेतले.
ऑपरेशन यशस्वी झालेच, त्याचबरोबर तो तरुण कोरोनामुक्तही झाला. यामध्ये डॉ. अनमोल, डॉ. वसंत देशमुख, डॉ. शिवप्रसाद हिरूगडे, डॉ. कौतुक मेंच, डॉ. रसिम मुल्ला, डॉ. दीपक जायस्वाल, डॉ. प्रसन्ना शिंदे, डॉ. पृथ्वीराज, डॉ. निरद यांनी प्रयत्न केले.कोणी नाही, त्याच्यासाठी थोरला दवाखानाकोरोनाच्या महामारीत रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याने मृत्यूची संख्या वाढत आहे. सामान्य माणसाला खासगी रुग्णालयात जाणे मुश्कील बनले आहे. गोरगरिबांसाठी कोणी वाली आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एरव्ही गोरगरिबांचा आधारवड ठरलेला थोरला दवाखाना कोरोनाच्या महामारीतही तितक्याच आपुलकीने काम करत आहे.
माझे पती गंभीर होते, त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया होणे गरजेचे असताना कोणी दारात उभे करून घेतले नाही. अशा परिस्थित सीपीआर रुग्णालयातील डॉक्टर माझ्यासाठी देव बनून मदतीला आले आणि पतीचे प्राण वाचले.- रुग्णाची पत्नी