संदीप बावचे
शिरोळ : विधानसभा निवडणुकीनंतर मिनी विधानसभा म्हणून झालेल्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे तालुक्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. गटातटाची ताकद ग्रामपंचायत निवडणुकीत दिसली असली तरी निकालानंतर गावागावात नेत्यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे.
तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत बारा गावांत सत्तांतर तर पंधरा गावांमध्ये सत्ताधाऱ्यांनी यश मिळविले. लक्ष्यवेधी ठरलेल्या यड्राव येथे सत्ताधारी आघाडीला हादरा बसला. उदगावमध्ये स्वाभिमानीची सत्ता बिनविरोध उमेदवारामुळे अबाधित राहिली असली तरी काठावरचे बहुमत माजी जि. प. सदस्य सावकर मादनाईक यांना धोक्याचे ठरू शकते. नांदणीतील पराभव स्वाभिमानीला चिंतन करायला लावणारा आहे. दानोळीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांच्या आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या. विरोधी नागरिक संघटनेने बारा जागांवर जिंकून शिंदे यांच्या आघाडीला धूळ चारली. दानोळीतील हे परिवर्तन आगामी जि.प., पं. स. निवडणुकीत उमटणार आहे. दत्तवाडमध्ये त्रिशंकू चित्र निर्माण झाल्याने दत्तवाड जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक गट पातळीवर झालेल्या या निवडणुकीत तालुक्यातील नेत्यांनी मात्र बारीक लक्ष ठेवून आपले कार्यकर्ते निवडून आणण्यात यश मिळविले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाचे संदर्भ पुन्हा बदलले आहेत. मिनी विधानसभा म्हणून झालेल्या या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. पक्षीय पातळीवर या निवडणुका होणार असल्याने नेत्यांची खरी कसोटी येथेच दिसणार आहे.
...........
यड्रावकर, पाटील यांना यश
आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना अपेक्षित यश मिळाले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने अस्तित्व कायम ठेवले असून भाजपाने बहुतांश गावांत स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून केलेली व्यूहरचना यशस्वी ठरली आहे. एकूणच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची साखर पेरणी या निवडणुकीत नेत्यांनी केली आहे.