कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या १५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी कान, नाक, घसा विभागाने विशेष परिश्रम घेतले. आतापर्यंत एकूण ११५ जणांवर उपचार करण्यात आले. खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया, औषधांसाठी सहा, आठ लाख रुपये खर्च येतो. पण पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या आजारावरील उपचारासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्याने १५० म्युकरच्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डाॅ. अजित लोकरे यांनी दिली.
सीपीआरमध्ये १८ मेला पहिला म्युकरचा रुग्ण दाखल झाला. त्याच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. म्युकर जीवघेणा आजार आहे. या आजारात डोळे, मेंदूूना बाधा होते. हा आजार जुनाच आहे. पण तो संसर्गजन्य आजार नाही. हा रोग पहिल्या टप्प्यात असतानाच जर आपण उपचारासाठी दाखल झाल्यास नियंत्रणात आणता येते. म्युकरच्या रुग्णावर शस्त्रक्रियेची, औषधोपचाराची गरज असते. एक शस्त्रक्रिया सुमारे चार ते पाच तास चालते. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसा विभागाचे डॉ. वासंती पाटील, डाॅ. मिलिंद सामानगडकर, डाॅ. स्नेहल सोनार, डाॅ. दिलीप वाडकर यांचे पथक म्युकरवर उपचार करतात.
चौकट
रोज चार ते पाच शस्त्रक्रिया
सीपीआरमध्ये आतापर्यंत म्युकरच्या २०३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी १५० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात. ११५ रुग्णांनी म्युकरवर मात केली. येत्या काही दिवसात सात रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने कान, नाक, घसा विभागातील तज्ज्ञ डॉक्टर विशेष परिश्रम घेत आहेत. दोन रुग्णावरील शस्त्रक्रिया सकाळी ८.३० ते संध्याकाळी ७ पर्यंत करण्यात आली. सध्या रोज चार ते पाच शस्त्रक्रिया केल्या जातात.