कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत या निवडणुकीत ‘सरस की वारस’ बाजी मारणार याचा फैसला आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत होणार आहे. या निकालाकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचा नकाशाच पुरता बदलून टाकणारी ही निवडणूक आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी, तर काँग्रेस आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांना प्रथमच शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी तगडे आव्हान दिले आहे.महाडिक यांचे संसदेतील काम, विकासकामांचा पाठपुरावा, क्रियाशील खासदार अशी प्रतिमा होती. शेट्टी हे पाव शतक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आहेत. शेतकऱ्यांसाठी केलेल्या चळवळीमुळेच त्यांना जिल्हा परिषदेपासून आमदारकी व खासदारकीही मिळाली. यंदा ते लोकसभेतील विजयाची हॅटट्रिक करतात का, याकडे देशातील शेतकरी चळवळींचे लक्ष आहे. महाडिक यांना माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे वारस संजय मंडलिक यांनी; तर शेट्टी यांना माजी खासदार निवेदिता माने यांचे वारस धैर्यशील माने यांनी आव्हान दिले. कोल्हापूरची जनता या दोन्ही मतदारसंघांत कुणाची निवड करते, हे समजण्यासाठी आता पाच-सहा तासांचाच अवधी राहिला आहे.मतदारसंघात मंडलिक हे विजयी होतील असे वारे असले तरी महाडिक यांनाही विजयाबाबत प्रचंड आत्मविश्वास आहे. विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये मंडलिक व शेट्टी यांचा विजय होऊ शकतो, असे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे महाडिक व माने यांच्या कार्यकर्त्यांतील घालमेल वाढली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ एक अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या निवडणुकीत देशात मोदी लाट असतानाही धनंजय महाडिक यांनी वादळात दिवा लावून विजयी मिळविला होता. त्यावेळी दोन्ही काँग्रेसची अभेद्य एकजूट त्यांच्या पाठीशी खंबीरपणे होती. त्या एकजुटीनेच त्यांना विजय मिळवून दिला; परंतु त्यानंतर त्यांनी दोन्ही काँग्रेसला सोडून पाच वर्षे भाजपची संगत केली.त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत त्यांच्यासोबत ते ज्या पक्षातून निवडणुकीस उभे राहिले, ते दोन्ही काँग्रेस पक्षच एकदिलाने नव्हते. परंतु तरीही त्यांनी जोरदार यंत्रणा राबवून मंडलिक यांचा तणाव वाढवण्याचे काम केले.२०१४ चा निकालकोल्हापूर लोकसभा मतदारसंघराष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक हे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा ३३२५९ मतांनी पराभव करून विजयी.धनंजय महाडिक यांना (राष्टÑवादी कॉँग्रेस) यांना ६ लाख ७ हजार ६६५ मते मिळाली होती.संजय मंडलिक (शिवसेना) यांना ५ लाख ७४ हजार ४०६ मते मिळाली होती.हातकणंगले लोकसभा मतदारसंघमहायुती पुरस्कृत स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार खासदार राजू शेट्टी हे काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा १ लाख ७७ हजार ८१० मतांनी पराभव करून विजयी झाले होते.राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष) यांना ६ लाख ४० हजार ४२८ मते मिळाली होती.कल्लाप्पा आवाडे (कॉँग्रेस) यांना ४ लाख ६२ हजार ६१८ मते मिळाली होती.
सरस की वारस? आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:17 AM