कोल्हापूर : महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर चौक, पापाची तिकटी, गुजरी कॉर्नर या परिसरात मिरवणूक पाहण्यास आलेले दोन जखमी पुरुष व चेंगराचेंगरीत बेशुद्ध पडलेल्या चार महिलांना वेळेत उपचारासाठी दाखल करून ‘व्हाईट आर्मी’च्या जवानांनी सहाजणांचे प्राण वाचविले. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिनखांबी गणेश मंदिर परिसरात रविराज किरण रणदिवे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) हा फिट येऊन बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ मदत देऊन व्हाईट आर्मीच्या जवानांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याच परिसरात सायंकाळी पावणेआठ वाजता प्रल्हाद महादेव कोपार्डे (रा. मंगळवार पेठ) हा मंडळाच्या ट्रॉलीचा लोखंडी अँगल लागून जखमी झाला. त्यालाही भवानी मंडपमार्गे बाहेर नेऊन शासकीय रुग्णालयात दाखल केले. याच दरम्यान पापाची तिकटी येथे डॉल्बीच्या गोंगाटासह चेंगराचेंगरी झाल्याने दोन महिला व दोन पुरुष बेशुद्ध पडले. ही बाब समजताच व्हाईट आर्मीच्या जवानांनी तत्काळ ‘वीन्स’च्या डॉक्टरांच्या मदतीने चारीही जणांना शुद्धीवर आणले. सायंकाळी महाद्वार रोडवर प्रचंड गर्दी झाल्याने ट्रॉलीखालून जाण्याच्या प्रयत्नात स्नेहा विनोद जाधव या जखमी झाल्या. त्यांनाही सीपीआर रुग्णालयात दाखल केले.यासह गुजरी कॉर्नर येथे रात्री नऊच्या सुमारास गरोदर महिला निपचित पडली होती. या महिलेसही ‘विन्स’च्या डॉक्टरांच्या मदतीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मिरवणूक मार्गावर २४ तासांहून अधिक काळ ‘व्हाईट आर्मी’चे १०० जवान कार्यरत होते. ( प्रतिनिधी)
‘व्हाईट आर्मी’च्या जवानांची अशीही मदत
By admin | Published: September 17, 2016 12:24 AM