कोल्हापूर : वरिष्ठांनी सूचना देऊनही आदेशाचे उल्लंघन करून कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवून दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. नियंत्रण कक्षाकडे बदली झालेल्यांमध्ये हातकणंगले पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक भवड व चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
सोमवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या हद्दीत अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करा, अशा सूचना केल्या होत्या; मात्र काही अधिकारी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. त्यात हातकणंगले येथील एका प्रकरणात पोलीस निरीक्षक भवड व उपनिरीक्षक पवार यांनी कर्तव्यात कसुरी केली. याबाबत दोन्ही अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांच्या नोटिसीला समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांची कसुरीने पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाकडे तडकाफडकी बदली करण्यात आली.