गडहिंग्लज : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्णांच्या वार्डामध्ये ये-जा करणाऱ्या काही जणांची सोमवारी अँटिजन चाचणी करण्यात आली. हा परिसर नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्यात आला.
या रुग्णालयामध्ये चक्क पॉझिटिव्ह वॉर्डामध्येच नागरिकांची सर्रास ये-जा सुरू असल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी रुग्णालय परिसरात जाऊन पाहणी केली.
या ठिकाणी आलेल्या नातेवाइकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. चहाच्या टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्याच्या सूचना नगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाला असलेली अन्य गेट बंद करून फक्त मुख्य प्रवेशद्वार सुरू राहील आणि तेथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
अगदीच एखादा रुग्ण अतिवयस्कर, गंभीर असेल आणि त्यांच्याजवळ एखादा नातेवाईक राहण्याचीच गरज असेल तर जो नातेवाईक आत असेल त्याने रुग्ण बरा झाल्यानंतरच त्यांच्याबरोबरच बाहेर यायचे असल्याचे निक्षून सांगण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर नातेवाईक येत असल्याने या परिसरात वाहनेही पार्किंग केली जात होती. डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी वगळता इतरांसाठी हा नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्यात आला.
चौकट
स्वॅब संकलन केंद्र हलविण्याच्या सूचना
याच आवारात स्वॅब संकलन केंद्र असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. हे टाळण्यासाठी हेे स्वॅब संकलन केंद्र शेंद्री माळावर हलविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
चौकट
राजकीय दबाव जास्त
रुग्णालयामधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सुरुवातीच्या काळात डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाइकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या तालुक्यात नातेवाइकांना आत सोडा असा राजकीय दबाव असल्याच्या तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावरही या गोष्टी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर उपाय म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.