सुनिल चौगलेआमजाई व्हरवडे: गणेश चतुर्थी दिवशी माहेरी येऊन दिवसभर थांबून गौरी दिवशी येतो असे आईला व भावाला सांगून रुपाली सासरला निघून गेली. दरम्यान तिला ताप आला अन् मृत्यूनेच गाठले. रुपालीच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत माहिती अशी की, आमजाई व्हरवडे ता. राधानगरी येथील रुपाली संग्राम बळप (वय ३०) हिचा गुण्यागोविंदाने संसार सुरु होता. दोन मुले, घर सांभाळत ती पतीला व्यवसायात मदत करणारी रुपाली अत्यंत हूशार व शांत स्वभावाची होती. शनिवारी गणेश चतुर्थी दिवशी माहेरी येऊन दिवसभर थांबून गौरी दिवशी येतो असे आईला व भावाला सांगून सासरला निघून गेली होती.दरम्यानच, रविवारी सकाळी तिला ताप आला. गावात उपचार करुनही ताप कमी आला नाही त्यामुळे रविवारी रात्रीच तिला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असतानाच सोमवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. शेवटी गौरी आणायला ती माहेरला आलीच नाही. तिच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबियांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.मुले पोरकी झालीत !एक व चार वर्षाची दोन लहान मुले आईच्या आकस्मिक मृत्यूने पोरकी झालीत. त्यांना पाहून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.
Kolhapur: ..अन् गौरी सणाला गौराई परतलीच नाही, रुपालीचा चटका लावणारा आकस्मिक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 4:28 PM