युवराज कवाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरच्या संगीत क्षेत्रात आपल्या अप्रतिम कलाकारीने प्रसिद्ध असलेला प्रफुल मनोहर शेंडगे (वय ४३, रा. राजारामपुरी, मातंग वसाहत) या हरहुन्नरी कलावंताचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोल्हापूरसह पुणे, मुंबईपर्यंत प्रफुल ढोलकी वादक म्हणून प्रसिद्ध होता. दक्षिण आफ्रिकेतील एका म्युझिक बँडने त्यास दोन वर्षांकरिता करारबद्धही केले होते. ढोलकी ॲक्टोपॅड, तबला, हार्मोनियम ही वाद्य वाजविण्यात तो अत्यंत तरबेज होता. त्याने मूड मेलडी नावाचा म्युझिक बँड निर्माण करून त्यामार्फत हजारो कार्यक्रम केले होते.
राजारामपुरी मातंग वसाहतीतील अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रफुलला लहानपणापासूनच संगीताची खूप आवड होती. त्यात घरात आजोबा हलगी वादक असल्याने तो वारसाही त्याला लाभला. वयाच्या पाचव्या वर्षापासून भजन, कीर्तनामध्ये जाऊन बसणे, ते ऐकणे, वाद्य कसे वाजवतात ते पाहणे, असा संगीताचा विलक्षण लळा त्याला लागला होता. भजन करता करता वाढत्या वयात ऑर्केस्ट्रा, संगीत रजनी असे कार्यक्रम पाहायला जाण्यामुळे प्रथम त्याला ढोलकीविषयी खूप आवड निर्माण झाली. याच काळात त्याची संगीत शिक्षक संजय साळोखे यांच्याशी ओळख झाली आणि प्रफुलमधील उपजत कला साळोखे यांच्यामुळे उदयास आली. कोल्हापूरमधील वेगवेगळ्या संगीत कार्यक्रमांत प्रफुलची ढोलकी वाजू लागली आणि बघता बघता प्रफुल उत्कृष्ट ढोलकी वादक म्हणून नावारूपास आला. कोरोनामुळे मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम बंद झाल्याने प्रफुलला आपल्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत होती. त्याने फळांचा व्यवसाय सुरू केला होता; पण त्यातून तुटपुंजी मिळकत असल्यामुळे त्यांची आर्थिक चिंता वाढली होती. या चिंता घेऊनच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.