कोल्हापूर : कोरोनामुळे पर्यटकांच्या येण्या-जाण्यावर प्रशासनाने निर्बंध घातल्याने शहरातील लॉजिंग, यात्रीनिवास बंदच आहेत. या शहरातील सुमारे ५० हून अधिक बंद लॉजिंग, यात्रीनिवासामध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी बुधवारी रात्री अचानक तपासणी केली. पण, पोलिसांना असा कोणताही प्रकार दिसून आला नाही.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड महिने कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात बाहेरून येणारे सर्वच पर्यटक थांबले. त्यामुळे शहरातील सर्वच लॉजिंग, यात्रीनिवास बंदच राहिली आहेत. दोन दिवसांपूर्वी काही ठिकाणी युवकांची टोळकी पत्त्याच्या पानांचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत आढळले. त्या पार्श्वभूमीवर शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहुपुरी आणि राजारामपुरी पोलिसांनी बुधवारी रात्री अचानक आपापल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील लॉजिंग, यात्रीनिवास यांची तपासणी केली. बंद असलेल्या लॉजिंग, यात्रीनिवासाचा वापर गैरप्रकारासाठी होऊ नये, यासाठी पोलिसांनीही अचानक तपासणी केली. सुमारे ५० हून अधिक ठिकाणी ही तपासणी केली. पण, त्या ठिकाणी असा कोणताही गैरप्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुस्कारा सोडला.