कोल्हापूर : उन्हाच्या तडाख्याने पक्षी घायाळ होऊन पडत आहेत. कोणाचे पंख पतंगाच्या मांज्यामुळे कापले जात आहेत, तर कधी आणखी एखाद्या कारणाने पक्षीजीवन धोक्यात येत आहे. अशावेळी काही माणसं पक्षीप्रेम दाखवतात, तेव्हा अजूनही भूतदया व माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. अशाच भूतदयेचा प्रत्यय बुधवारी सकाळी रंकाळा तलाव परिसरात ‘ग्रे हेरॉन’ (बगळा) प्रकारच्या पक्ष्याबाबत आला.ज्येष्ठ पत्रकार व छायाचित्रकार राजा उपळेकर बुधवारी सकाळी शालिनी पॅलेससमोरील नारळाच्या झाडाजवळून फिरत असताना अचानक झाडावरून चित्कार करीत एक ग्रे हेरॉन (बगळा) पक्षी खाली कोसळला. जवळ जाऊन पाहिले तर पक्ष्याचे दोन्ही पाय मोडलेल्या स्थितीत होते. एका पायाचे हाड तर तुटून लोंबकळत होते.
उपळेकर त्या पक्ष्याला कशी मदत करता येईल या विचारात असतानाच रंकाळ्यावर नियमित फिरायला येणाऱ्यांपैकी निखिल गुरव व रोहित गुरव हेही त्यांच्या मदतीला धावले. तिघांनी या पक्ष्याला पकडून अग्निशामक दलाच्या जवानांना कळविले. त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी रवी पोवार येथे आले. त्यांनी या पक्ष्याला ताब्यात घेतले. तोपर्यंत अग्निशमन दलाचे वाहनही तेथे पोहोचले. या वाहनातून ग्रे हेरॉन पक्ष्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.