सातारा : आत्तापर्यंत आपण लूटमारीच्या घटनांमध्ये पुरुषांची नावे नेहमी ऐकत आलो आहोत. परंतु आता या घटनांमध्ये मुलींचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे पोलिसांची डोकीही चक्रावली आहेत. कोंडवे येथे दोन मुलींनी एका मुलाच्या मदतीने घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पारूबाई किसन निंबाळकर (वय ७०, रा. कोंडवे, ता. सातारा) या कोंडवे परिसरातील शेतामध्ये शुक्रवारी दुपारी म्हैस चारण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दुचाकीवरून दोन मुली आणि एक मुलगा तेथे आला. दोन्ही मुलींनी तोंडाला स्कार्प बांधला होता. निंबाळकर यांच्याशी त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला; परंतु याचवेळी त्यांची म्हैस बुजून धाऊ लागली. त्यामुळे निंबाळकर या म्हशीच्या पाठीमागे निघून गेल्या. म्हैस घरी गेल्यानंतर त्याही घरी गेल्या. त्यांच्या पाठोपाठ संबंधित दोन मुली आणि एक मुलगाही गेला.निंबाळकर यांच्या घरात गेल्यानंतर या तिघांनी त्यांच्या तोंडाला, हाता-पायाला चिकटपट्टी लावली.
‘आजी घाबरू नका, आम्ही तुम्हाला मारणार नाही; परंतु तुमच्या गळ्यातील माळ काढून द्या,’ अशा त्या मुली म्हणत होत्या. मुलींसोबत असलेल्या मुलाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची बोरमाळ काढून घेतली. त्यानंतर तिघेही तेथून दुचाकीवरून निघून गेले. काही वेळानंतर निंबाळकर यांनी तोंडाला लावलेली चिकटपट्टी कशीबसी काढली. या प्रकाराची माहिती त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितली. संबंधितांचा नागरिकांनी शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत.
सातारा तालुका पोलीस ठाण्यात पारूबाई निंबाळकर यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात दोन मुली आणि एका मुलावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई या करत आहेत.पोलिसांकडून शंका-कुशंका..पारूबाई निंबाळकर यांचे भरवस्तीत घर आहे. असे असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निंबाळकर या घरात एकट्याच राहतात. हा प्रकार घडला, त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. दोन महाविद्यालयीन मुली अशा घटनांमध्ये कशा काय सामील होऊ शकतात, अशी शंकाही पोलिसांकडून उपस्थित केली जात आहे.