गणपती कोळीकुरुंदवाड : अखेरचा घटका मोजत असलेले जुणे क्वार्टर्स, इमारतीची मोडक्या अवस्थेत असलेली वासे, तुळ्या, छतापासून जमीनीपर्यंत लोंबकळत असलेले जळमट यातूनही वाट काढत व दुर्लक्षित राहिलेल्या घराची तक्रार न करता पद्मश्री सुधा मूर्ती यांनी येथील आपल्या घराची व घरातील प्रत्येक खोलीची पाहणी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मी कितीही मोठ्या पदावर गेले तरी माझे घर, येथील जिव्हाळा कधीच विसरू शकत नाही आणि कोल्हापूरची कन्या असल्याचा मला सार्थ अभिमान आहे अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली.इन्फोसिस कंपनीच्या प्रमुख, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे वडील १९५५ मध्ये येथील जिल्हा परिषद दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी होते. तर त्यांचे भाऊ दवाखाण्यालगत असलेल्या शासकीय इमारतीत राहत होते. सुधा मूर्ती या सोमवारी शहरातील त्यांनी वास्तव्यास असलेल्या इमारत पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद क्वाटर्सला भेट दिली. बंद असलेल्या या इमारतीचा दरवाजा सुधा मूर्ती साठी उघडण्यात आला होता. खोलीची पडझड झाली होती. छतापासून जमीनीपर्यंत जळमट लोंबकळत होते. ते बाजूला सारत त्यांनी इमारतीतील प्रत्येक खोलीची पाहणी केली व बालपणाच्या आठवणी काढत भाऊक झाल्या.त्यानंतर वडीलांनी सेवा बजावत असलेले दवाखाना, त्या शिकत असलेल्या कन्या शाळा व आईची मैत्रीण असलेल्या सुशिला शहा यांची भेट घेऊन मनसोक्त चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मोठी बहीण, नातलग, शिरोळचे तहसिलदार अपर्णा मोरे, कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, कन्या शाळेचे मुख्याध्यापक रविकुमार पाटील, बांधकाम अभियंता रविकिरण गायकवाड, पप्पू पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे आदी उपस्थित होते.कन्या शाळेचे भाग्य उजाडणारसुधा मूर्ती यांचे इयत्ता पहिली व दुसरीचे शिक्षण जिल्हा परिषदेचे येथील कन्या शाळेत झाले होते. त्यामुळे त्यांनी या शाळेला भेट देऊन पाहणी केली. व शिक्षकांना शासनाकडून मिळणाऱ्या सेवेव्यतिरीक्त शाळेसाठी काही हवे असल्यास मला कळवा त्याची त्वरित पूर्तता करण्यात येईल असे शिक्षकांना सांगितले. त्यामुळे अनेक संकटांचा सामना करणार्या येथील जिल्हा परिषद शाळेचे सुधा मूर्ती यांच्या मदतीतून भाग्य उजाडणार आहे.
बालपणाच्या आठवणी काढत सुधा मूर्ती झाल्या भाऊक, आईच्या मैत्रीणीची भेट घेऊन केली मनसोक्त चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 6:36 PM