कोल्हापूर : चंद्रपूर-वणी लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विजयी झालेच म्हणून समजा असे सांगत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या विजयाची मतदानापूर्वीच घोषणा करून टाकली. मंत्री पाटील मंगळवारी येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.मंत्री पाटील म्हणाले, अबकी बार चारसौ पार याबध्दल आपल्याला आत्मविश्र्वास आणि विरोधकांनाही विश्र्वास वाटत आहे. सल्ला देण्यासाठी फक्त दोनशे कोटी रुपये घेणारे राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनीही भाजप ३०० जागा जिंकेल असे जाहीर केले आहे. त्यांनी विरोधकांना लोकसभेची ही निवडणूकच लढवू नका, यावेळेला आराम करूया, वेळ आणि पैसाही वाचेल. पुढे २०२९ ची तयारी नीट करूया असे सुचवले आहे. चारसौ पार ही अतिशयोक्ती नाही. कारण आताच आमच्याकडे ३५३ जागा आहेत. त्यात फक्त ४७ जागांची नव्याने भर घालायची आहे. गेल्या निवडणुकीत ज्या १४४ जागांवर पराभव झाला त्यावर आम्ही गेली पाच वर्षे काम करत आहे. तिथे चार-चार केंद्रीय मंत्र्यांची ताकद लावली आहे. चंद्रपूरची जागेवर कांहीतरी मतांनी आमचा पराभव झाला. आता तिथे सुधीरभाऊ लढत आहेत. ही जागा मिळणार की नाही, ही जागा तर आलीच म्हणून समजा. अशा १४४ पैकी अगदी कांहीही झाले तरी गेलाबाजार ५० जागा निवडून आणणे आम्हाला सहज शक्य असल्याचा दावा मंत्री पाटील यांनी केला व विरोधकांना निवडणूकच न लढवता आराम करण्याचा सल्ला दिला.
चंद्रपुरात मुनगंटीवार विजय झालेत; चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला निकाल
By विश्वास पाटील | Published: April 09, 2024 7:30 PM