लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेली अनेक वर्षे लक्ष्मीपुरी येथील खुराड्यात अडकलेल्या कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय मोकळा श्वास घेणार आहे. शाहू मार्केट यार्ड येथील जागेत ते स्थलांतरीत होत असून, १ एप्रिलपासून कार्यालयाचे कामकाज येथून चालणार आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३२ साखर कारखान्यांचा डोलारा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर आहे; मात्र गेली अनेक वर्षे लक्ष्मीपुरी येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे कार्यालय सुरू आहे. दोन जिल्ह्यातील साखर कारखाने व शेतकऱ्यांचा सतत राबता असतो. लक्ष्मीपुरी हे नेहमी वर्दळीचे ठिकाण असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यातच या कार्यालयात जाताना बेकरीचा उग्र वास घेऊनच पुढे जावे लागते. कार्यालयाच्या बाहेर वाहनाच्या आवाजाने काम करणे कर्मचाऱ्यांनाही अवघड आहे. शेतकरी संघटनांचे आंदोलन असले की संपूर्ण लक्ष्मीपुरी परिसरातील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे हे कार्यालय इतरत्र हलवावे, यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. शासकीय मध्यवर्ती इमारतीसह इतर पर्याय पुढे आले होते. त्यातूनच शाहू मार्केट यार्ड येथील इमारतीमध्ये कार्यालय स्थलांतर होते. विभागीय सहनिबंधक (लेखापरिक्षण) कार्यालयाशेजारी साखर सहसंचालक कार्यालय जात आहे. सुमारे २७०० चौरस फुटाचे सुसज्ज कार्यालय होत आहे.