कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस आंदोलनाची दिशा स्पष्ट केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी पेटली. ‘दालमिया’, ‘डॉ. डी. वाय. पाटील’, ‘वारणा’, ‘संताजी घोरपडे’ या कारखान्यांचे गाळप धडाक्यात सुरू झाले आहे. राज्यातील साखर कारखान्यांच्या नजरा जयसिंगपूर येथील ऊस परिषदेकडे लागल्या होत्या. एकरकमी ‘एफआरपी’वरून यंदाच्या गळीत हंगामापुढे पेच निर्माण झाला होता. यंदा पाऊस एकदमच कमी झाल्याने पाणीटंचाई भासणार आहे. जानेवारीनंतर उसाला पाणी मिळणार नाही, अशा परिस्थितीत ऊस जगवायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ‘दालमिया’, ‘संताजी घोरपडे’ या कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता; पण ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने एकरकमी एफआरपीसाठी हे कारखाने बंद पाडले. राज्यासमोरील पाणीटंचाईचे संकट आणि ऊस उत्पादकांची सुरू असलेली घालमेल ओळखून खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. हंगाम सुरू करण्याची परवानगी देऊन एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. एकरकमी एफआरपी दिली, तरच कारखाने सुरू राहतील. अन्यथा, कारखाना बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वच कारखानदारांच्या नजरा जयसिंगपूर येथील ऊस परिषदेकडे लागल्या होत्या. यामध्ये शेतकरी संघटनेने आंदोलनाची दिशा स्पष्ट केल्याने कारखानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दालमिया-आसुर्ले, डॉ. डी. वाय. पाटील-असळज, वारणा, संताजी घोरपडे- कागल या कारखान्यांचा हंगाम जोरात सुरू झाला असून, इतर कारखाने येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) तुटपुंजी वाढ : तोडणी मजुरांना मुंडेंची आठवण मराठवाड्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या टोळ्या कारखाना कार्यस्थळावर दाखल होऊ लागल्या आहेत. तोडणी मजुरीमध्ये केलेल्या तुटपुंज्या वाढीबाबत त्यांच्या चेहऱ्यावर संताप दिसत आहे. गोपीनाथ मुंडे असते, तर आमची अशी हेळसांड झाली नसती, अशा भावना मजुरांमधून व्यक्त होत आहेत.
साखर कारखान्यांची धुराडी पेटली
By admin | Published: November 08, 2015 12:44 AM