कोल्हापूर : ऊसदराची कोंडी फुटल्याने रविवारी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या ऊसतोडी धुमधडाक्यात सुरू झाल्या. पंधरा दिवस प्रतीक्षेत असलेले ऊसतोड मजुरांचे कोयते अखेर तोडीसाठी सरसावले. साखर कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या यंत्रणेची लगबग वाढली आहे.‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने ‘एफआरपी’ अधिक २०० रुपयांची मागणी करून ऊसदर आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. संघटना व कारखानदार आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने पेच वाढत गेला. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे ऊसतोडणी मजूर परजिल्ह्यातून दाखल झाले होते. त्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होताच; पण त्याबरोबर हंगाम लांबला तर जानेवारीनंतर पाणीटंचाईच्या झळा जाणवणार, ही समस्या कारखानदारांसमोर होती. पंधरा दिवस चर्चेच्या फेºया रंगल्या. याकडे सर्व ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले होते.अखेर शनिवारी (दि. १०) स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांच्यात तडजोड झाली. ऊसदराची कोंडी फुटल्याने ‘स्वाभिमानी’चे चक्का जाम आंदोलन मागे घेतल्याने कारखान्यांनी शनिवारी दुपारपासूनच आपापली ऊसतोडणी यंत्रणा सुरू केली होती. पंधरा दिवस हंगामाच्या प्रतीक्षेत असलेले ऊसतोड मजुरांचे कोयते, खुरपी अखेर सरसावली. रविवारी सकाळी बहुतांश कारखान्यांनी ऊसतोडणीची प्रक्रिया सुरू केली असून, अनेक कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपही सुरू केले आहे.‘राजाराम’, ‘संताजी घोरपडे’, ‘बिद्री’, ‘हमीदवाडा’, ‘डी. वाय. पाटील’, ‘दत्त-शिरोळ’ या कारखान्यांचे गाळप सुरू आहे. ‘कुंभी’, ‘दालमिया’, ‘वारणा’, ‘शरद’, ‘शाहू’ने रविवारी ऊसतोडी दिल्या; तर ‘पंचगंगा’ कारखाना आज, सोमवारी ऊसतोडी देणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम गती घेईल.वैरणीचा प्रश्न मिटलासप्टेंबरपासूनच पावसाने दडी मारण्यास सुरुवात केल्याने यंदा ओल्या वैरणीचा प्रश्न दूध उत्पादकांसमोर आहे. दराच्या कोंडीमुळे कारखाने उशिरा सुरू झाल्याने अडचणी वाढल्या होत्या. अखेर कोंडी फुटली आणि दूध उत्पादकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.‘शिरोळ’मध्ये अजून आंदोलनाची धग‘स्वाभिमानी’ने आंदोलन मागे घेतले असले तरी अजून ‘शिरोळ’मध्ये आंदोलनाची धग कायम आहे. ‘अंकुश’, ‘बळिराजा’सह इतर संघटनांनी रविवारी ‘अन्नत्याग’ आंदोलन सुरू केल्याने तणाव आहे.
साखर कारखाने धुमधडाक्यात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:50 AM