कोल्हापूर : साखरेचे आयात शुल्क पंधरा टक्क्यांवरून चाळीस टक्के करण्याचा निर्णय केंद्र शासनाने काल, सोमवारी घेतला. त्यामुळे खुल्या बाजारातील साखरेचे दर क्विंटलमागे आज, मंगळवारी आणखी ५० रुपयांनी वाढून ते २९२५ रुपयांपर्यंत गेले. केंद्र शासनाने काल घेतलेल्या दोन-तीन महत्त्वाच्या निर्णयांचा परिणाम म्हणून खुल्या बाजारातील साखरेचे दर वाढले आहेत. हा दर क्विंटलला ३२०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिली उचल देऊन थांबलेल्या कारखान्यांना दसरा-दिवाळीस शेतकऱ्यांना टनामागे आणखी काही रक्कम देणे शक्य होईल.देशात गेल्या हंगामातील ९० लाख टन साखर शिल्लक आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात २४२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. त्याशिवाय १८ लाख टन कच्ची साखर आयात झाली. देशाची वार्षिक गरज २३० लाख टन असल्याने त्या तुलनेत साखर जास्त शिल्लक असल्याने दर घसरले होते; परंतु कालच्या निर्णयाने देशाच्या बाजारपेठेत आता बाहेरून साखर येण्यास निर्बंध आले व त्याचवेळी देशातील कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान मिळणार असल्याने ती साखर बाहेर जाणार, हे ध्यानात आल्याने व्यापारी साखर खरेदीकडे वळल्याचे चित्र एका दिवसात तयार झाले. परिणामी आज दरवाढ झाल्याचे या क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात नुकत्याच संपलेल्या साखर हंगामाच्या सुरुवातीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह तिन्ही संघटनांनी पहिल्या उचलीसाठी जोरदार आंदोलन केले होते. बाजारातील साखरेचे दर घसरलेले असल्याने राज्य बँकेने मूल्यांकनच कमी केले. त्यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पहिली उचल देणे शक्य नव्हते. त्यामुळे बहुतेक कारखान्यांनी कारवाई टाळण्यासाठी कायद्याने जेवढी किमान व वाजवी किंमत (एफआरपी) देणे बंधनकारक आहे, तेवढीच रक्कम दिली आहे. ही रक्कम सरासरी दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. परंतु ‘स्वाभिमानी’ने केलेली तडजोड ही २६५० रुपये आहे. त्यामुळे आता टनास किमान २०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी संघटना आक्रमक होऊ शकते. साखर उद्योगासंबंधीचे चांगले निर्णय होण्यात खासदार राजू शेट्टी यांचाही सहभाग राहिला असल्याने आता कारखानदारीचे प्रश्न सोडविले तर तुम्ही शेतकऱ्यांना चांगले दर द्या, असा त्यांचा रेटा आहे. कालच त्यांनी आता पैसे नाहीत असे कोण कारखानदार सांगू लागला, तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
साखर दरात आणखी ५० रुपयांची वाढ
By admin | Published: June 25, 2014 1:10 AM