लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : जीवनावश्यक वस्तूमधील असणारे सर्व प्रकारची अन्नधान्य जीएसटीमधून वगळण्यात आली आहेत. साखरही जीवनावश्यक वस्तूमध्ये असून जीएसटीमधून साखरेला वगळावे, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या मिलरोलर पूजन अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष दादासो लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकार परिषदेत आ. नरके म्हणाले, जर जीवनावश्यक वस्तूत समावेश असणाऱ्या वस्तू जीएसटीमधून वगळल्या आहेत, तर साखरेचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असताना जीएसटीमध्ये समावेश का केला. आपण जीएसटीबाबत घेण्यात आलेल्या अधिवेशनात साखरेला जीएसटीमधून वगळावे, अशी मागणी केली असून, यामुळे प्रतिक्विंटल १८० रुपये साखर कारखान्यांचे वाचणार आहेत. ऊस उत्पादकांना देताना एफआरपी देताना या पैशाची आर्थिक मदत साखर कारखान्यांना होणार आहे. यावर्षी केंद्र शासनाने २५०० रुपये पहिल्या ९.५ टक्के व पुढील एक टक्क्यासाठी २६८ रुपये जाहीर केले. याबाबत केंद्र शासनाचे अभिनंदन. मात्र उसाला एफआरपीएवढी रक्कम देताना साखर उत्पादन करण्यासाठी येणाऱ्या उत्पादन खर्चाचा विचार करून प्रतिकिलो ४० ते ४२ रुपये दर मिळावा, असे धोरण केंद्र व राज्य शासनाने अवलंबावे असे सांगितले. यावर्षी ७०:३०च्या फॉर्म्युल्याप्रमाणे दर देण्याचे नियोजन असून, २०१६-१७ मध्ये गाळप झालेल्या ऊस व साखर उत्पादन यांचे नफातोटा पत्रक ऊसदर नियंत्रण मंडळाला पाठवून आणखी दर ऊस उत्पादकांना देण्याविषयी शिफारस झाल्यास आपण देणार असल्याचे आमदार नरके म्हणाले. यावेळी सर्व संचालक कार्यकारी संचालक प्रकाश चिटणी, सचिव एम. ए. पाटील, चीफ इंजिनिअर संजय पाटील, एकनाथ पाटील, चीफ केमिस्ट प्रकाश पाटील, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
‘जीएसटी’मधून साखर वगळावी
By admin | Published: May 30, 2017 12:19 AM