- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : साखरेचा किमान विक्रीदर वाढत नसल्याने एफआरपी देणे, तसेच खेळत्या भांडवलाचीही कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री चालू केली आहे. कागदोपत्री मात्र ३,१०० रुपये प्रति क्विंटलनेच व्यवहार दाखविला जात आहे. यात साखर कारखान्यांना क्विंटलमागे दीडशे ते दोनशे रुपयांचा तोटा होत आहे. अशा व्यवहारांबाबत कारखानदार-व्यापारी अधिकृतपणे मौन धारण करीत असले तरी, खासगीत याशिवाय आमच्यापुढे दुसरा पर्याय नसल्याचे मान्य करतात. साखरेला कारखान्याच्या दारात (एक्स मिल) ३,१०० रुपये प्रतिक्विंटल दर केंद्र सरकारने निश्चित केलेला आहे. यापेक्षा कमी दराने विक्री केल्यास सरकार कारवाई करू शकते. देशात सध्या अतिरिक्त साखर आहे. त्यामुळेच इथेनॉल निर्मितीवर भर देण्याला सरकार प्रोत्साहन देत आहे. तरीही साखर अतिरिक्त असल्याने आणि बाजारात उठाव नसल्याने साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलाची टंचाई जाणवत आहे. सध्या २,९०० ते ३,००० रुपये क्विंटल दराने ही साखर विकली जात आहे. साखरेचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च ३,६०० ते ३,७०० रुपये आहे. विक्रीदर वाढीचा निर्णय कधी?साखरेचा किमान विक्री दर ३,८०० रुपये प्रति क्विंटल करावा, अशी मागणी कारखानदारांनी केलेली आहे. सरकारने हा दर ३,३०० रुपये करण्याचे सूतोवाच केले होते. अन्न मंत्रालयाने तसा प्रस्तावही केंद्रीय मंत्रिमंडळापुढे सादर केला होता. मात्र चार-पाच महिने उलटले तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातही याबाबत कसलाही उल्लेख नाही. त्यामुळे साखरेचा दर कधी वाढणार, असा सवाल कारखानदार करीत आहेत. हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री करू नये यासाठी आम्ही कारखानदारांकडे आग्रह धरीत आहोत; पण नाइलाज म्हणून काही कारखाने असा प्रकार करीत आहेत. त्यांची संख्या खूप कमी आहे. - बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन
हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची होतेय विक्री, कारखानदारांची अळीमिळीगुपचिळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 7:21 AM