कोपार्डे : दिवाळी सण मोठा, आनंदा नाही तोटा, अशी म्हण साखर कामगारांच्या यंदाच्या दिवाळीला मात्र लागू पडत नाही. जिल्ह्यातील आघाडीच्या कारखान्यांनीही दिवाळीला कामगारांच्या बोनसबाबत वाच्यता केली नसून, आपल्या कुशल कामगिरीने शेतकऱ्यांसह जनतेची दिवाळी गोड करणाऱ्या साखर कामगारांची यंदाची दिवाळी मात्र कडू बनली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. पैकी १६ सहकारी, ७ खासगी आहेत. जवळजवळ ३० ते ३५ हजार साखर कामगार या उद्योगात हंगामी अथवा कायम स्वरूपात काम करतात. दरवर्षी कामगारांना त्यांच्या कामाची खुशाली म्हणून कारखानदारांकडून बोनस स्वरूपात दिवाळी भेट दिली जाते. यात ८.३३ टक्के बोनस व १५ ते १६ टक्के सानुग्रह अनुदान असा २२ ते २५ टक्के बोनस दिला जातो. मात्र, यावेळी काहीच न देण्याचा प्रकार प्रथमच झाला असून, साखर कामगारांत याबाबत मोठा असंतोष दिसून येत आहे. सध्या एफआरपीची ऊसदराची रक्कम एकरकमी मिळावी म्हणून शेतकरी संघटनांनी रेटा लावला आहे. मात्र, साखरेचे दर घसरल्याने एकरकमी ऊसदर देणे शक्य नसल्याची कारखानदारांनी भूमिका मांडली आहे. अशा परिस्थितीत जर साखर कामगारांना बोनस दिला, तर शेतकऱ्यांचा रोष निर्माण होईल, असा विश्वामित्री पवित्रा कारखानदारांनी घेतला. ना धड शेतकऱ्यांच्या ऊसदराबाबत भूमिका जाहीर केली, ना धड कामगारांना त्यांच्या हक्काच्या बोनसला न्याय दिला. यातून कष्टकऱ्यांमध्येच संशय निर्माण करण्याचे तंत्र कारखानदारांनी वापरले असल्याचे मत एका साखर कामगाराने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. वेतन कराराची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. याला १७ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात हंगामी कामगारांना केवळ चार महिन्यांच्या नोकरीवर संसार चालविणे कठीण झाले आहे, तर कायम कामगारांनाही चार-चार महिन्यांनी पगार मिळत आहे. याचा परिणाम साखर कामगारांची आर्थिक घडीच विस्कटत आहे. बहुतांश साखर कारखान्यांत संघटना कारखानदारांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत. आक्रमक भूमिका न घेतल्याने साखर कामगारांच्या न्याय्य व हक्काच्या मागण्याही बाजूला पडत आहेत. साखर कामगारांच्या कष्टातून कारखान्यांना सुवर्णकाळ निर्माण झाला होता. मात्र, सहकारमहर्र्षींच्या तिसऱ्या पिढीने आपल्या कारभाराने हा उद्योग अडचणीत आणलाय. कामगारांचे हक्क दिलेच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. - राजेंद्र नाळे (कॉमे्रड), साखर कामगार
साखर कामगारांची दिवाळी कडू
By admin | Published: November 10, 2015 11:16 PM