कोल्हापूर : ऊस परिषदेच्या धास्तीमुळे आतापर्यंत शांत असलेल्या कोल्हापुरात कर्नाटकमधील कारखान्याच्या अरेरावीवरून शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने पेट घेतला आहे. शिरोळमधील दानोळी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला आग लावण्यात आली; तर हातकणंगले तालुक्यातील आळते येथे ट्रॅक्टरच्या चाकांतील हवा सोडून वाहतूक रोखण्यात आली.
ऊस परिषद झाल्याशिवाय कारखान्यांनी ऊस तोडण्याचे धाडस करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. कारखाना व्यवस्थापनाला तशी सूचनाही दिली आहे. काही अपवाद वगळता कारखान्यांकडून तोडीचा कार्यक्रमही थांबविण्यात आला आहे. उद्या, शनिवारी होणाºया ऊस परिषदेची जय्यत तयारी सुरू असतानाच गुरुवारी पहाटे कर्नाटकमधील अथणी व व्यंकटेश्वरा या दोन खासगी साखर कारखान्यांकडून ऊस वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे वाहतूक रोखली. काही आक्रमक कार्यकर्त्यांनी तर ट्रॅक्टरलाच आग लावून दिली.
या घटनेनंतर साखरपट्ट्यात ‘स्वाभिमानी’कडून ऊस आंदोलनाच्या आठवणी ताज्या झाल्या. या परिषदेचा धसका आधीच कारखान्यांनी घेतला असल्यामुळे ज्यांच्या तोडण्या सुरू आहेत, त्यांनीही त्या थांबवण्याचा निर्णय घेतला. परिणामी ऊस परिषदेच्या आधी एक दिवस ऊसपट्ट्यात कमालीची शांतता जाणवत आहे.एफआरपीवरून सोमवारी बैठकउद्या, शनिवारी होणाºया ऊस परिषदेत हंगामाची कोंडी फोडायची की आंदोलन करायचे याचा निर्णय होणार आहे. दरम्यान, एफआरपी देण्यावरून कारखानदार आणि शेतकरी संघटना यांचे मतभेद असल्याने त्यांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. २५) सर्व साखर कारखानदार व शेतकरी संघटनेची बैठक कोल्हापुरात होणार आहे. याचदरम्यान राज्यात सरकार स्थापनेच्या अंतिम हालचाली सुरू असल्याने या बैठकीत तोडगा निघण्याविषयी शंका घेतल्या जात आहेत.