प्रकाश पाटील - कोपार्डे साखर दरात हंगाम सुरू झाल्यापासूनची घसरण थांबत नसल्याने कारखानदारांपुढे आता एफ.आर.पी.प्रमाणे ऊसदर देण्यासाठी मोठे संकट निर्माण झाले असून, कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतील ३३ कारखान्यांकडे १५ फेब्रुवारी २०१५ अखेर गाळप झालेल्या उसाचे ९४३ कोटी ५९ लाख १६ हजार बिलापोटी शेतकऱ्यांची देणी थकीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. हंगाम २०१४-१५ मध्ये शेतकरी संघटनेने आपले ऊस दराचे आंदोलन म्यान केले व कायद्याने एफ.आर.पी. तरी द्या, अशी भूमिका घेतली. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे गाळप हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले. मात्र, या हंगामात शेतकरी संघटना यांनी ऊस उत्पादकांना रास्त व किफायतशीर ऊस दर मिळावा, यासाठी आंदोलनापेक्षा कायद्याचा आधार घेत शासनाला वेठीस धरल्याने शासकीय पातळीवर हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्यानंतर ज्या कारखानदारांनी ऊसदर जाहीर केला नाही अशांना नोटिसा बजावल्या. कायद्याच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा व एफ.आर.पी. न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालक मंडळालाच जबाबदार धरण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. जाहीर करून कारवाई टाळणेच पसंत केले. मात्र, याचवेळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफ.आर.पी. ऐवजी २००० ते २१०० रुपये प्रतिटन जाहीर करून हंगाम सुरू केले.नोव्हेंबर २०१४-१५ चा हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचा प्रतिक्वंटल असणारा ३१०० रुपये दर सतत घसरत असून, आज २२०० रुपयांवर येऊन ठेपला आहे. कारखानदारांनी ओपन टेंडरद्वारे साखर विक्री करण्यास सुरुवात केली असली तरी व्यापारीही दरदिवशी साखरेच्या दराच्या घसरणीमुळे ती खरेदी करण्यास पुढे येईनात. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे कोठून उपलब्ध करायचा हा प्रश्न कारखानदारांपुढे उभा आहे.साखरेच्या दरात प्रचंड घसरण सुरूआहे. एफ.आर.पी.च्या कायद्याचा कोलदांडा लावणाऱ्या शासनाने साखरेच्या दराची हमी का देत नाही. साखर उद्योग मोठ्या प्रमाणात सहकारी आहेत. हा ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. तो कोलमडला तर शेतकरी, कामगार मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होतील. - चंद्रदीप नरके, अध्यक्ष कुंभी-कासारीसर्वाधिक रक्कमसर्वात जास्त थकीत रक्कम जवाहर हुपरीकडे १०३ कोटी २० लाख २२ हजार आहे. त्यापाठोपाठ वारणा ९४ कोटी ६४ लाख ८५ हजार आहे. हे जिल्ह्यात १० लाख मे.टनापेक्षा जास्त उसाचे गाळप करणारे कारखाने आहेत.
साखर कारखान्यांकडे साडेनऊशे कोटी थकीत
By admin | Published: March 18, 2015 9:54 PM