राजाराम लोंढे- कोल्हापूर --डोक्यावर सूर्यनारायण आग ओकत असताना धरणीमातेची ऊबही पेटल्याने आता पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पोटच्या पोरासारखी जपलेली पिके डोळ्यादेखत करपू लागल्याने बळिराजाचा जीव कासावीस झाला. पाणीच नसल्याने खते व औषधांची फवारणी कोणावर करायची? या विवंचनेत शेतकरी असल्याने एरव्ही खरिपाच्या तयारीसाठी हाऊसफुल्ल असणारी शेती सेवा केंद्रे अक्षरश: ओस पडलेली दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असले तरी उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल, मका, कडधान्य व भाताचे क्षेत्रही कमी नाही. जवळपास ११०० हेक्टरमध्ये भात, सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी अधिक असते. ही पिके पाणी खाणारी आहेत, त्यात पाणीटंचाई भासणार, या भीतीने शेतकऱ्यांनी यावर्षी भात, भुईमूग व सूर्यफुलाची पेरणी कमी केली. भातपिकाला तर सतत गारवा लागतो, आता उपसा बंदी असल्याने पाण्याअभावी भात खुरटली आहेत. भुईमूग व सूर्यफुल परिपक्वतेचा काळ असल्याने आता पाण्याची खरी गरज आहे. दहा दिवसांच्या उपसा बंदीनंतर वीज मिळते तेही आठ तास, त्यात उसाला पाणी द्यायचे की इतर पिकांना द्यायचे हेच शेतकऱ्यांना कळेना झाले. डोळ्यादेखत पिके करपू लागल्याने शिवाराकडे जाऊन करायचे तरी काय? अशा मानसिकतेत शेतकरी आहे. आगामी महिना-दीड महिना पिके कशी जगवता येतील. यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पिकांना खत सोडाच पण इतर फवारणी करण्याचे धाडसही करता येईना. त्याचा परिणाम शेतकरी सेवा केंद्रांवर दिसत आहे. या काळात गजबजलेली केंद्रे अक्षरश: ओस पडल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. (पुर्वार्ध)खतांची मागणी घटली!गतवर्षीच्या तुलनेत मार्च व एप्रिल महिन्यात खत वापरात शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. विविध खतांच्या मागणीत २२ हजार टनांनी घट झाली असून सर्वाधिक वापराच्या युरियाची मागणी तब्बल ४३६० टनांनी कमी झाली आहे.वळीव पाऊस पडला नाहीतर आगामी दीड-दोन महिने शेतकऱ्यांसाठी कसोटीचा काळ राहणार आहे. पाण्याअभावी पाने गुंडाळून जाऊ नयेत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. जमिनीतील बाष्पीभवन थांबवत असताना पानावाटे होणारे अंतरंगातील बाष्पीभवन थांबविण्यासाठी फवारण्या घ्याव्यात. - डॉ. अशोक पिसाळ, वनस्पती शास्त्रज्ञ
ऊस, भुईमूग, सूर्यफुलांनी माना टाकल्या
By admin | Published: April 28, 2016 12:41 AM