संदीप बावचे - शिरोळ - तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऊस दराच्या प्रश्नासाठी ‘स्वाभिमानी’बरोबर शिवसेनेचीही ताकद मिळणार आहे. ऊस चळवळीतून संघर्ष करून उल्हास पाटील यांनी नुकतीच आमदारकी पटकाविली. खा. राजू शेट्टी यांच्यानंतर ऊस चळवळीतील दुसरा नेता आ. पाटील यांच्या रूपातून शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे साहजिकच खासदार आणि आमदार हे दोघेही ऊस दरासाठी झटणार, हे मात्र निश्चित आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, उसाला आधारभूत दर ठरावा, यासाठी राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यात चळवळ उभा केली. शिरोळमधून सुरू झालेल्या या चळवळीने पश्चिम महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. निर्धार यात्रा, पंढरपूर ते बारामती पायी दिंडी, तत्कालीन मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री यांच्या निवासस्थानांसमोर आंदोलनाचा वेगळा पायंडाच त्यांनी पाडला. चळवळीला नेतृत्व असावे म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढवून ती जिंकली. त्यानंतर आमदार आणि आता दुसऱ्यांदा खासदार म्हणून शेतकऱ्यांचा नेता लोकसभेत पोहोचला आहे. ऊस परिषदेच्या माध्यमातून गेली बारा वर्षे शेट्टी यांनी आपला लढा कायम ठेवला आहे. ऊस परिषदेत उसाला पहिली उचल किती मागायची, आंदोलनाची दिशा कोणती ठरवायची, असे अनेक निर्णय या परिषदेत होत असतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून उसाला चांगला दर शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ओळखले जाते. याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील चळवळीच्या जोरावर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे उल्हास पाटील यांनीही ऊस दरासाठी चांगला लढा दिला होता. खा. शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनीही आंदोलनात भाग घेऊन शेतकऱ्यांचा नेता म्हणून काम केले आहे. नेतृत्वाकडून न्याय मिळाला नसल्यामुळे उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ‘रामराम’ ठोकून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून भगवा फडकविला. संघटित शक्तीची ताकद काय असते, हे पाटील यांनी या निवडणुकीत पटवून दिले आहे. चळवळीतून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता आमदार उल्हास पाटील यांच्या रूपाने शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दुसरा नेता मिळाला आहे. केंद्रात भाजप सरकार आहे, तर राज्यात भाजप-शिवसेना सत्ता येण्याची शक्यता आहे. यामुळे ऊस दरासाठी महायुतीतील खा. राजू शेट्टी लोकसभेत, तर शिवसेनेचे आ. उल्हास पाटील विधानसभेत आवाज उठवितील, अशा अपेक्षा शेतकऱ्यांना लागून राहिल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर अन्य शेतीमालाची उत्पादने घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न देखील आहेत. शिवाय तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्नही आवासून उभा आहे. यासाठी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टिकोनातून चालना मिळणे गरजेचे आहे. एकूणच खा. शेट्टींबरोबरच आता आ. पाटील यांच्यामुळे शेतकऱ्यांचे बळ वाढले आहे. यामुळे भविष्यकाळात शिरोळ तालुक्यातील प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. शिवसेनेची ऊस परिषद ?उसाला दर मिळावा, यासाठी गेली बारा वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस परिषद घेत आहे. हंगामापूर्वी ऊस परिषद, आंदोलन मग कारखाने सुरू, असेच समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’बरोबर आता शिवसेनाही ऊस परिषद घेणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ऊस दर आंदोलनास बळ येणार
By admin | Published: October 23, 2014 10:16 PM